राष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात

पुणे। मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित २ ऱ्या राष्ट्रीय लेजर रन स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. आज शनिवार दिनांक २० जुलै रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण २०० खेळाडू सहभागी होणार आहेत.अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.

या स्पर्धेतून बुडापेस्टमधील हंगेरी येथे होणाऱ्या लेझर रन जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही जागतिक स्पर्धा ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ऑलिंपिक असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव आणि एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन कॉन्फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र राज्य क्रीडा खात्याचे सहसंचालक जयप्रकाश दुबे, जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत १२ इव्हेंट होणार असून यामध्ये मुले आणि मुली असे दोन गट असतील. वयवर्षे १० ते ७० या वयोगटाचा समावेश असणार आहे.