राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेसाठी देशभरातून विक्रमी प्रतिसाद

स्पर्धेत 1200 हुन अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे: सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला देशभरातून 1200 हुन अधिक खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे.

ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये  दि.5 ते 11 ऑक्टोबर 2018 या कालावधीत रंगणार आहे.

पत्रकारपरिषेदत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजेश शेलार यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देशभरांतील सर्वाधिक रकमेची हि स्पर्धा आहे.

या स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण पारितोषिक रक्कम 12,50,000/- ठेवण्यात आली आहे. सुदेश शेलार मेमोरिअल फाऊंडेशन तर्फे शिष्यवृत्तीची रक्कम 10खेळाडूंमध्ये प्रत्येकी 40,000/-रुपये अशी देण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, सुदेश शेलार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे वार्षिकरित्या आयोजन करण्यात येत आहे. सुदेश शेलार हे स्वतःएक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होते आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना(पीडीटीटीए) व डेक्कन जिमखानाच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव होते. क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक गुणवान खेळाडू घडावेत याकरिता सुदेश शेलार यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते.

स्पर्धेत आशियाई क्रीडा पदक विजेता शरथ कमल, मनिका बात्रा, हर्मित देसाई, अँथोनी अमलराज, राष्ट्रकुल पदक विजेता सनील शेट्टी, मधुरिका पाटकर, सुतीर्थ मुखर्जी, मौमा दास, पूजा सहस्त्रबुद्धे कोपरकर यांसह स्वस्तिका घोष, दिया चितळे, राधिका सकपाळ यांसारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत झुंजणार आहेत.

स्पर्धेला शुक्रवार, दि.5 ऑक्टोबर 2018रोजी प्रारंभ होणार असून गुरुवार दि.11ऑक्टोबर 2018रोजी स्पर्धा संपणार आहे. वरिष्ठ, युथ व कुमार गटांतील अंतिम फेरीचे सामने मंगळवार, दि.10 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहेत.

कुमार गटाच्या अंतिम फेरीचे सामने दि.10 ऑक्टोबर 2018 रोजी, तर सब-ज्युनियर, कॅडेट सामने दि.11ऑक्टोबर 2018रोजी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या, उपांत्य, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

तसेच, ही स्पर्धा 12,15,18, 21 वर्षाखालील, वरिष्ठ, पुरूष व महिला खुला गट अशा विविध गटांत होणार आहे. स्पर्धेत देशभरांतून 1200 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून टेबल टेनिसविषयी खेळाडूंचा वाढता प्रतिसाद यातून लक्षात येतो.

स्पर्धेला 11स्पोर्ट्स, स्टॅग, एचपीसीएल, मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचअल फंड स्कीम, सुराणा अँड बोथरा कन्स्ट्रक्शन, निस्सान, मेडलाईफ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

वेस्टएंड मॉल हे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी आमचे मॉल पार्टनर असून ती प्रमोशनल ऍक्टिव्हिटी 6ऑक्टोबर रोजी करणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून गणेशन अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली असून स्पर्धेचे ड्रॉ 4ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

तसेच, याशिवाय आशियाई व राष्ट्रकूल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना 11स्पोर्ट्सच्या विता दाणी यांच्या हस्ते सत्कार होणार असल्याचे सांगितले.