प्रवीण खाबिया नाशिक सायकलीस्टचे नवे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला ज्ञात असलेले प्रवीण मदनलाल खाबिया यांची नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फाउंडेशनचे संस्थापक आयपीएस अधिकारी हरीश बैजल सर यांच्या उपस्थितीत सर्वानुमते त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. फाउंडेशनचे काळजीवाहू अध्यक्ष शैलेश राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
खाबिया ग्रुपचे संस्थापक असलेले प्रवीण खाबिया हे नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत. ‘नाशिक आयकॉन’ पुरस्कार मिळालेल्या प्रवीण खाबिया यांचा सामाजिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात सहभाग राहिला असून मुंबई मॅरेथॉन तसेच दुबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला आहे. नाशिक सायकलीस्टच्या पंढरपूर वारीमध्येही दोनदा सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय अंध संघटनेचे बोर्ड सदस्य असून दरवर्षी अंध व्यक्तींसाठी क्रिकेट स्पर्धा भरविण्यात खाबिया यांचा मोठा वाटा आहे.
निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रवीण खाबिया म्हणाले की, नाशिक सायकलीस्ट हा एक मोठा वटवृक्ष बनला असून नाशिक सायकलीस्टचे आत्ता जे सदस्य आहेत त्यांना अभिमान वाटावा आणि जे सदस्य नाहीत त्यांना हेवा वाटावा असा ब्रांड नाशिक सायकलीस्टला बनवू असा विश्वास व्यक्त केला. येत्या काळात होणारे विविध उपक्रम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवून नाशिक सायकलीस्टची सदस्य संख्या वाढवून नाशिक शहराला देशाची सायकल कॅपिटल बनविण्याच्या स्वप्नाकडे घोडदौड जलद करायची असल्याचे खाबिया म्हणाले.
यावेळी बोलताना हरीश बैजल सरांनी दिवंगत जसपालजींच्या नेतृत्वात नाशिक सायकलीस्ट एका नव्या उंचीवर गेली असून त्यापुढील जबाबदारी खाबिया चांगली पार पडतील असा विश्वास व्यक्त केला.
आज आयोजित कार्यक्रमात पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय एमटीबी स्पर्धेसाठी निवड झालेल्या नाशिकच्या सात खेळाडूंसह रेस अराउंड ऑस्ट्रिया ही आल्प्स पर्वत संगांची सैर घडवणारी स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ले. कर्नल भारत पन्नू व दर्शन दुबे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी ले. कर्नल भारत पन्नू आणि एमटीबी स्पर्धेसाठी महिलांच्या खुल्या गटात यश अनुजा उगले हिने मनोगत व्यक्त केले. पन्नू यांनी आपला रेस अराउंड ऑस्ट्रियाचा अनुभव कथन केला. तर अनुजाने नाशिक सायकलीस्ट व सायकलिंग असोसिएशन प्रशिक्षक नितीन नागरे यांचे आभार मानले.
यावेळी भविष्यात नाशिक सायकलीस्ट तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘नाशिक सायकलीस्ट स्प्रिंटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तुकाराम नवले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेल्या या उपक्रमातून सायकलिंगला खेळ म्हणून पुढे आणण्याचे काम करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ‘सायकल विथ क्रुझ’ या अनोख्या सायकल राईडबद्दलची माहिती ओशन कॅम्पचे अमोल भुरे यांनी दिली.