आशिष नेहरा खेळणार दिल्लीत कारकिर्दीतील शेवटचा सामना

दिल्ली । भारतीय संघातील वेगवान डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणार टी२० सामना नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.

भारतीय संघात खेळत असलेला नेहरा हा एक अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. तो मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, गौतम गंभीर आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

विराट कोहली हा नेहराचा शेवटचा भारतीय कर्णधार असेल ज्याच्या नेतृत्वाखाली तो शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळेल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे जो आपल्या होम ग्राउंडवर भारतात दिमाखात निवृत्ती घेणार आहे. सचिनला शेवटचा सामना मुंबईच्या त्याच्या होम ग्राउंडवर खेळायला मिळाला होता.

सचिन आणि नेहराचे एकवेळचे संघसहकारी असणाऱ्या कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर आणि सेहवाग यांनाही हे भाग्य लाभले नाही. तर युवराज आणि भज्जी यांना तर भारतीय संघाची दारे आता बंद झाल्यात जमा आहेत. नेहराचा अंतिम सामना दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार असल्यामुळे तो सर्वात सुदैवी खेळाडू ठरणार आहे.

नेहराने भारतीय संघातून १६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्यानं २३५ विकेट्स घेतल्या आहेत. जर तो कधीही दुखापतग्रस्त झाला नसता तर त्याने भारताकडून अधिक सामने खेळले असते. २०११ साली भारतीय संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा नेहरा त्या संघाचा भाग होता.