संतोष कुमार घोष ट्रॉफी स्पर्धेत अभिनव सिंघच्या शतकी खेळीने न्यू ईरा संघाला विजेतेपद

मुंबई: सलामीवीर अभिनव सिंघ याच्या शतकी खेळीने न्यू ईरा संघाला ७व्या संतोषकुमार घोष ट्रॉफी या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवून दिला.

आयुष जेठवा याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर अभिनव सिंघ याला

सर्वोत्तम फलंदाज आणि अमान मणिहार याला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. मुंबईचे माजी महान रणजीपटू पद्माकर शिवलकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

यावेळी एम.सी.ए.चे डॉ. उन्मेष खानविलकर, अरविंद कदम, श्रीकांत तिगडी,अरमान मलिक आणि शैलेश करमरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बँक ऑफ इंडिया व युनियन बँक यांच्या सहकार्याने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत काल के.आर.पी. इलेव्हन संघाच्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू ईरा संघाची सुरुवात अडखळत झाली होती.

केवळ २९ धावांत त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. अथर्व भोसलेच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने ही करामत केली होती.

कालच्या ३ बाद ४६ वरून पुढे खेळताना धावसंख्येत १९ धावांची भर पडल्यानंतर साद शेख तंबूत परतला आणि के.आर.पी. संघाच्या गोटात चैतन्य पसरले.

मात्र अभिनव सिंघच्या साथीला श्रेयस मांडलिक आला आणि या जोडीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीतली हवाच काढून टाकली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी मिळवून देत संघाचा विजय निश्चित केला.

अभिनवने आपल्या शतकी खेळीत १५ चौकार ठोकले तर श्रेयसने १३ चौकारांसह ८४ धावा केल्या. न्यू ईरा संघाने ९० षटकात ८ बाद २७५ धावा करून आपला डाव घोषित केला.

काल तीन बळी मिळवत अपेक्षा उंचावणाऱ्या अथर्व भोसलेला आज एकही बळी मिळविता आला नाही तर दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज सुमित जोशी याने ४२ धावांत २ बळी मिळविले.

दुसऱ्या डावात के.आर.पी. इलेव्हनने १७ षटकात ३ बाद ९६ धावा केल्या, ज्यात आयुष जेठ्वाचा वाटा होता नाबाद ६० धावांचा.

संक्षिप्त धावफलक:

के.आर.पी. इलेव्हन – ७६.३ षटकात सर्वबाद १८१ (शुभम गिरकर ६१, आयुष जेठवा ३७, निशांत कदम २४,देवांग कुडाळकर १९, अमन मणिहार ५९/३, साद शेख ६४/७)आणि १७ षटकात ३ बाद ९६ (आयुष जेठवा नाबाद ६०, अभिषेक जैस्वाल २८/२)

पराभूत  वि.

न्यू ईरा ९० षटकात ८  बाद ८ बाद २७५ डाव घोषित (अभिनव सिंघ १०९, श्रेयस मांडलिक ८४,तेजस चाळके २०; अथर्व भोसले ४४/३, सुमित जोशी ४२/२)