न्यूझीलंडची विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात; मालिकेत १-० आघाडी

वेलिंग्टन । येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने विंडीजवर एक डाव आणि ६७ धावांनी मात करत दोन कसोटी मालिकेत १-० आघाडी घेतली.

ग्रँडहोम व ब्लुन्डेलची उत्कृष्ट फलंदाजी आणि जन्माने दक्षिण आफ्रिकन असलेला नील वाग्नरची अचूक गोलंदाजीने न्यूझीलँडला विंडीजवर सहज विजय मिळवणं शक्य झाले. नील वाग्नर सामन्याचा मानकरी ठरत त्याने एकूण ९ विकेट घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचला.

कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला पात्र ठरत विंडीजचा पहिला डाव १३४ धावांमध्ये गुंडाळला. विंडीजच्या फलंदाजीला उत्तर देत न्यूझीलंडने आपला पहिला डाव ९ बाद ५२० वर घोषित करत ३८६ धावांची भक्कम आघाडी घेतली.

ग्रँडहोम व ब्लुन्डेल यांच्या शतकी कामगिरीमुळे न्यूझीलंडला ५०० डावांचा डोंगर पार करता आला.

दुसऱ्या डावाची २ बाद २३१ अशी भक्कम सुरुवात करणारा विंडीज संघ ३१९ धावत गारद झाला. विंडीज संघाने शेवटचे ८ बळी अवघ्या ८८ धावांमध्ये गमावत न्यूझीलंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. ब्रेथवेट आणि हॅतम्येर यांची अर्धशतकी खेळी अपयशी ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय हा विजय मिळवण्यास योग्य ठरला. हा विजय सर्वांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शक्य झाला असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन पत्रकार परिषेदेत म्हणाला.