सचिन म्हणतो, विराटची आक्रमकता हीच संघाची ताकद !

भारताचा कर्णधार विराट कोहलीची आक्रमकता हीच भारताची खरी ताकद आहे, असे क्रिकेटचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या पदार्पणापासूनच्या आक्रमकतेने भारतीय संघाला पूर्णपणे बदलले आहे .

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने आपले ३१वे वनडे शतक पूर्ण केले. वैयक्तिक दृष्ट्या विराट कोहलीसाठी हा सामना खूपच विशेष ठरला. विराटने या सामन्यात वनडेमध्ये दोनशे सामन्यांचा टप्पाही पार केला. पण भारताला त्याला या सामन्यात विजय मिळवून देता आला नाही. ३१ शतके करून त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला सर्वाधिक वनडे शतक करणाऱ्या यादीत मागे टाकले. तो आता सचिननंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने वनडेत ४९ शतके केली आहेत.

“पदार्पणापासूनच मी कोहलीला बघत आहे. त्याची आक्रमकता अजूनही तशीच आहे. पण सर्वांनी त्याला त्याच्या आक्रमकतेसाठी नावेही ठेवली होती पण आज तीच आक्रमकता भारतीय संघाची ताकद बनली आहे.”, असे सचिन म्हणाला.

“त्याची आक्रमकता आजही तशीच आहे आणि तो आजही तसाच खेळतो. त्याचा विरुद्ध बोलणारे व्यक्ती बदलल्या आहेत पण तो बदलला नाही. त्याने त्याच्या कामगिरीने सर्वांची तोंड बंद केली आहेत.”

संघाबद्दल विचारले असता सचिन म्हणाला, “भारतीय संघ हा खूप समतोल संघ आहे. आपल्याकडे असे फिरकी गोलंदाज आहेत जे फलंदाजी करू शकतात. एवढेच नाही तर आपल्याकडे असे वेगवान गोलंदाजही आहेत जे फलंदाजी करता.भुवनेश्वर कुमारने काल ते दाखवून दिले. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडू भारतीय संघाला समतोल बनवत आहेत.”