१८ वर्षीय क्रिकेटपटूचा धमाका, वनडेत ठोकल्या तब्बल १८० धावा

क्राइस्टचर्च । न्यूझीलँड विरुद्ध केनिया यांच्यातील वनडे सामन्यात न्यूझीलँडचा सलामीवीर जॅकोब भुला या खेळाडूने १८० धावांची तुफानी खेळी केली आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात आज ही कामगिरी करताना १० चौकार आणि ५ षटकार खेचले.

त्याच्या याच खेळीच्या जोरावर न्यूझीलँडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ४३६ धावा केल्या. या विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आहेत.

या सामन्यात न्यूझीलँड संघाने केनियाला २४३ धावांनी पराभूत केले.

१९ वर्षाखालील विश्वचषकात पहिले द्विशतक करण्यासाठी जॅकोबला केवळ २० धावांची गरज होती. परंतु तो १८० धावांवर असताना धावबाद झाला. जॅकोब प्रमाणेच ३ दिवसांपूर्वीच इंग्लंड ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचे द्विशतक फक्त २० धावांनी हुकले होते.

१८० ही १९ वर्षाखालील विश्वचषकातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या असून यापूर्वी हा विक्रम पॅगॉन (१७६धावा ) या विंडीज खेळाडूच्या नावावर होता.