नेमारचा पॅरिस संघासोबत सराव सुरु

पॅरिस सेंट जर्मेन संघासोबत विक्रमी करारामुळे क्रीडा विश्वात चर्चेचा विषय ठरलेला नेमार हा पॅरीसमध्ये दाखल झाला आहे. त्याचे पॅरिसमधील फुटबॉल चाहत्यांनी खूप उत्साहात स्वागत केले. बार्सेलोनासोडून पॅरिसला येणे त्याला मानसिकदृष्टया खूप अवघड गेल्याचे त्याने बार्सेलोना संघासाठी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येते.

बार्सेलोना संघा सोडून पॅरिस सेंट जर्मेन संघासाठी खेळण्याच्या तयारीत असणाऱ्या नेमारने मागील शुक्रवारी पॅरिस संघाच्या सरावात पहिल्यांदा भाग घेतला. या वर्षी पॅरिसमध्ये डॅनी अल्वेस हा त्याचा ब्राझील संघातील सहकारी खेळाडूही दाखल झालेला आहे. डॅनी अल्वेसला मागीलवर्षी बार्सेलोनाकडून जुवेन्टस फुटबॉल क्लबने करारबद्ध केले होते. पण या वर्षी त्याला पॅरिस सेंट जर्मेन संघाने करारबद्ध केले आहे.

पॅरिसच्या संघात ब्राझेलियन खेळाडूंचा मोठा ताफा आहे. या संघात पॅरिस सेंट जर्मेन संघाचा कर्णधार थिआगो सिल्व्हा आहे जो ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातील नेमारचा सहकारी आहे. लुकास मौरा देखील या संघात आहे जो ब्राझील संघाकडून अधून मधून खेळताना दिसतो.

या सरावाला आलेला नेमार आपल्या ब्राझील संघातील सहकारी खेळाडू सोबत जास्त रमलेला दिसला. ब्राझीलसाठी १० नंबरची जर्सी परिधान करणारा नेमार बार्सेलोना संघासाठी ११ नंबरची जर्सी परिधान करायचा. नेमार पॅरिस सेंट जर्मेनसाठी १० नंबरची जर्सी घालून खेळणार आहे.