१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

आयर्लंडचा 36 वर्षीय क्रिकेटपटू नाइल ओब्रायनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

त्याने 2002 मध्ये डेन्मार्क विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तो कारकिर्दीत आयर्लंडकडून 216 सामन्यात खेळला आहे. तसेच तो आयर्लंडचा सर्वाधिक विकेट घेणारा यष्टीरक्षक आहे. त्याने यष्टीमागे 241 विकेट घेतल्या आहेत.

त्याचबरोबर यावर्षी मे महिन्यात आयर्लंडने खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याचा समावेश होता. हा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता.

तसेच त्याने 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या विजयी सामन्यात 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे त्याने त्याच्या जर्सीचा क्रमांकही 72 असा निवडला होता.

नाईल हा कौंटी क्रिकेटमध्ये केंट, नॉर्थम्प्टनशायर आणि लीसस्टरशायर या संघांकडून खेळला आहे. त्याच्या निवृत्तीनंतर नाईल म्हणाला, “माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेणे कठीण होते.”

“मला 16 वर्ष माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करता आल्याने मी खूप नशीबवान आहे. या वर्षात अनेक चढ-उतार आले. पण याकडे हास्य आणि आनंदी होऊन मी पाहत आहे.”

नाइल आणि त्याचा भाऊ केविन ओब्रायन हे दोघेही आयर्लंडसाठी क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना क्रिकेट आयर्लंडचे अध्यक्ष रिचर्ड होल्ड्सवर्थ म्हणाले ओब्रायन हे आयर्लंड क्रिकेट मोठे होण्याचे प्रतीक आहेत.

तसेच त्यांनी 2007 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केलेल्या नाइलच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याला त्याने मिळवलेल्या यशाचा अभिमान वाटायला हवा असेही ते म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-