काय आहे भारतीय संघाच्या जर्सीचा वाद

पल्लेकेल: ज्या देशात क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटूंना देवत्व बहाल केलं जात त्या देशात क्रिकेटपटू जी कोणती फॅशन अथवा स्टाईल करतात ती मोठ्या प्रमाणावर सामान्य क्रिकेटप्रेमी अंगिकारतात. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाशी मोठ्या प्रमाणावर करार करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असतात. परंतु जर याच कंपन्यांनी पुरवलेल्या काही गोष्टींच्या दर्जावरून जर क्रिकेटपटुंनी नाराजी व्यक्त केली तर त्याचा मोठा तोटा एखाद्या कंपनीला होऊ शकतो!

सध्या असच काही होत आहे ते भारतीय संघाला अधिकृत जर्सी पुरवणाऱ्या नाइके कंपनीकडून. भारतीय संघाला सध्या जर्सी पुरवणाऱ्या नाइके कंपनीच्या जर्सीबद्दल भारतीय संघातील काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. काही खेळाडूंनी या जर्सीच्या दर्जाबद्दल नाराजगी व्यक्त केल्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या कानावर घातली.

२००६ सालापासून नाइके हे नाव भारतीय संघासोबत जोडलं गेलं आहे. ते भारतीय संघाचे अधिकृत स्पॉन्सर आहेत. २०१६ साली नाइकेने २०२० सालापर्यंत स्पॉन्सर म्हणून भारतीय क्रिकेट बोर्डाला तब्बल ३७० कोटी रुपये दिले आहेत. ह्या कराराची सुरुवात १ जानेवारी २०१६ पासून झाली असून प्रत्येक सामन्याला भारतीय बोर्डाला अंदाजे ८७,३४,००० रुपये मिळतात.

याबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जोहरी म्हणाले, ” आम्ही नाइके कंपनीशी संपर्कात आहोत. आम्ही लवकरच याबद्दल पुढच्या आठवड्यात तोडगा काढू.”

भारतीय संघाबरोबर असलेला करार असाच पुढे सुरु राहण्यासाठी नाइकेने आपले प्रतिनिधी लंकेत पाठवले आहेत. ते खेळाडूंकडून लवकरच याबद्दल अभिप्राय घेणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाला नाइकेकडून दुसरी जर्सी देण्यात आली असून मंगळवारी भारतीय खेळाडूंनी सरावाच्या नवीन जर्सीमध्ये सराव केला. नवीन जर्सी ही दिसायला जुन्याच जर्सी सारखी आहे परंतु नवीन जर्सीचा दर्जा उत्तम आहे.

यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी भारतीय खेळाडूंचे नवीन जर्सीमधील फोटो काढल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.