त्याने एकाच सामन्यात केली दोन प्रकारे गोलंदाजी

इंदोर । विदर्भ विरुद्ध दिल्ली रणजी ट्रॉफी २०१७च्या अंतिम सामन्यात नितीश राणा या दिल्लीच्या गोलंदाजाने विदर्भाविरुद्ध एकाच डावात दोन प्रकारे गोलंदाजी केली.

डावातील त्याची पहिली ७ षटके त्याने मध्यमगती गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली तर पुढील षटके तो ऑफ स्पिनर म्हणून गोलंदाजी करताना दिसला.

विदर्भाच्या आदित्य सरवटे आणि अक्षय वाडकर यांनी दिल्लीकर गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. त्यात २०व्या वयात कर्णधारपद भूषवित असलेल्या दिल्लीकर रिषभ पंतसमोर अनुभवी नवदीप सैनी जखमी झाल्यामुळे जास्त पर्याय नव्हते.

संघातील अनेक पर्याय वापरून झाल्यावर कर्णधार पंतने राणालाच ऑफ स्पिन गोलंदाजी कर असे सांगितले. याचा स्पष्ट आवाज यष्टीजवळच्या स्टंपमधून आला.

एवढं सर्व करूनही राणाला काही विकेट मिळाली नाही. तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या २९५ धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना विदर्भाने ११५ षटकांत ६ बाद ३८३ धावा केल्या आहेत.