महिलांचे सामने टीव्हीवर प्रसारित न झाल्याने हरमनप्रीत कौरने व्यक्त केली नाराजी

भारतीय महिला संघाने नुकताच दक्षिण आफ्रिके विरुद्ध वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे. हा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेत प्रथमच द्विपक्षीय वनडे मालिकेत विजय मिळण्याचा इतिहासही भारतीय महिला संघाने रचला आहे.

भारतीय महिलांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचा मात्र क्रिकेट चाहत्यांना आनंद घेता आला नाही. कारण या मालिकेतील सामने टीव्हीवरून प्रसारित करण्यात आले नाही. याबद्दलच भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने नाराजी व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर ती असेही म्हणाले की काहीझाले तरी त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, ते फक्त खेळाकडे लक्ष केंद्रित करतात.

हरमनप्रीत bbc.co.uk या रेडिओ शोच्या मुलाखती दरम्यान म्हणाली, ” विश्वचषकानंतर आम्हाला अपेक्षित होते की जेव्हा आम्ही क्रिकेट खेळू तेव्हा आम्ही टीव्हीवर असू. मला असे वाटते की अजूनही सामने प्रसारित होत नाही ही खूप वाईट गोष्ट आहे. पण तरीही या मालिकेत संघ चांगला खेळला. आम्ही विश्वचषकाचे उपविजेते असल्यासारखे खेळलो. “

“मला माहित आहे सगळ्यांना सामने टीव्हीवर दिसतील असे अपेक्षित होते, पण सामने न दाखवल्याने फरक पडत नाही. कारण आम्ही इथे क्रिकेट खेळायला आलो आहोत आणि या गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. आम्ही आमच्या नियंत्रणाखाली ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

हरमनप्रीत पुढे म्हणाली, “एक महिला क्रिकेटपटू म्हणून मला वाटते की सामने लाईव्ह होत आहेत की नाही, या अशा गोष्टींचा आमच्यावर परिणाम होत नाही.आम्ही आमच्या कामगिरीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे आणि मला वाटते की आम्ही चांगले खेळत आहोत आणि पुढेही खेळत राहू.”

भारतीय महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघाचे सामने प्रसारित होत नसले तरी बीसीसीआय वूमेन्स, इएसपीएन क्रिकइन्फो, क्रिकबझ, क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि वूमेन्स क्रिकेट झोन हे त्यांच्या ट्विटर अकाउंट आणि त्यांच्या वेबसाईटवरून लाईव्ह स्कोरकार्ड देत होते. तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या युट्युब चॅनेलवरून ४ मिनिटांची हायलाईट्स प्रसारित केले होते.

उद्यापासून भारतीय महिला संघाचे दक्षिण आफ्रिका महिला संघाबरोबरच ५ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे.