जडेजाला नक्की झालयं तरी काय?

पुणे | आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात बेंगलोरने २० षटकांत ९ विकेट गमावत  १२७ धावा केल्या आहेत.

एवढी चांगली फलंदाजी असलेल्या या संघाला चेन्नई समोर फलंदाजी करणे कठीण होऊन बसले आहे. यात चेन्नईकडून अफलातून गोलंदाजी केली ती अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाने.

त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देत चक्क तीन विकेट्स घेतल्या. गेल्या ९ सामन्यात जडेजाने केवळ ३ विकेट्स घेतल्या होत्या तर आज एकाच सामन्यात तेवढ्या विकेट्स घेऊन त्याने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.

या सामन्यात त्याने कर्णधार विराट कोहलीला ८ धावांवर, मनदीप सिंगला ७ तर पार्थिव पटेलला ५३ धावांवर बाद केले.

परंतु एवढ्या दिवसांनंतर यश मिळुनही जडेजाने कोणतेही सेलिब्रेशन केले नाही. प्रत्येक विकेट मिळाल्यावर हा खेळाडू शांतच होता.

याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर पहायला मिळाली. अगदी आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅंडलनरुनही ही याबद्दल ट्विट करण्यात आले. शिवाय आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलनरुनही याबद्दल भाष्य करण्यात आले.

या संपुर्ण मोसमात आलेल्या अपयशामुळे जडेजाने असे केले असल्याचं बोललं जात आहे.