जडेजा अश्विनची वनडे कारकीर्द संपल्यात जमा? 

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन यांनी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारतीय फिरकी गोलंदाजांना २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळणे अवघड आहे असे मत मांडले आहे.

सध्या भारतीय संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मागील काही वनडे आणि टी २० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच ते अश्विन आणि जडेजासाठीचा भक्कम पर्याय म्हणून समोर येत आहेत.

याबद्दल वासन म्हणाले, ” लोक असे म्हणू शकतात की जडेजा आणि अश्विनला अजूनही संधी आहे, पण जोपर्यंत कुलदीप किंवा चहल दुखापतग्रस्त होत नाहीत तोपर्यंत अश्विन जाडेजाला संधी मिळेल असे मला वाटत नाही.”

कुलदीप आणि चहलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे मालिकेत ५ सामन्यात मिळून २९ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळेच अश्विन आणि जडेजासाठी पुन्हा मर्यादित षटकांच्या भारतीय संघात स्थान मिळवणे अवघड झाले आहे.

तसेच त्यांचा विकेट्स घेतानाची निडरता बघून अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की कुलदीप आणि चहलला संघव्यवस्थापनाने आणखी संधी द्यायला हवी. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही नुकतेच विधान केले होते की “स्पर्धा अजून संपलेली नाही.”

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडसमितीचे अध्यक्ष अतुल वासन पुढे म्हणाले, “विदेशी परिस्थितीत फिरकी गोलंदाजी या भारताच्या खऱ्या ताकदीला पाठिंबा दिल्याबद्दल विराट आणि संघ व्यवस्थापनेला श्रेय द्यायला हवे. त्याचबरोबर या दोन्ही व्रिस्ट स्पिनर्सने चांगली कामगिरी केली आहे.”

” माझ्यामते संघ व्यवस्थापनाने या दोन (कुलदीप आणि चहल) गोलंदाजांना विश्वचषकाला जाण्यापूर्वी ५० ते ६० सामने खेळवले पाहिजे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या सामन्यात जरी धावा दिल्या असल्या तरी ते चेंडूला फ्लाईट द्यायला घाबरत नाहीत.”

कुलदीप आणि चहल या जोडीला कसोटीतही स्थान द्यायला हवे का याविषयी वसान म्हणाले, “त्यात ते एक गूढ स्पिनरप्रमाणे असतील. एक वर्षांपूर्वी कोणीही विचार केला नव्हता की जडेजा आणि अश्विनला त्यांच्या जागेसाठी स्पर्धा करावी लागेल.”

अश्विन आणि जडेजाचे कसोटी संघात स्थान पक्के आहे. पण त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेले आहे.