भारतीय प्रशिक्षक पदाबद्दल कोणताही निर्णय झाला नाही: बीसीसीआय

भारतीय क्रिकेट बोर्डाने रवी शास्त्रीची प्रशिक्षक म्हणून झालेल्या निवडीच्या बातमीचे खंडन केले आहे. बीसीसीआयचे मुख्य सचिव अमिताभ चौधरी यांनी या चुकीच्या बातमीचे खंडन केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे रवी शास्त्रीची निवड झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमांनी आज संध्याकाळी दिली. ही निवड २०१७ ते २०१९ या काळासाठी असल्याचंही त्यात म्हणण्यात आलं होत.

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने प्रशिक्षक पदासाठी गेल्या महिन्यात अर्ज मागवले होते. काल त्यातील पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. काल मुलाखती नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि सल्लगार समितीचा सदस्य असलेल्या सौरभ गांगुलीने सांगितले की , प्रशिक्षक पदाची घोषणा करण्याआधी समिती कोहलीशी बोलू इच्छिते आणि म्हणूनच आज प्रशिक्षकाची घोषणा होणार नव्हती.

परंतु सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने ही निवड आजच करायला सांगितल्याचं बोलल जात आहे.