२०१८ साली होणारा क्रिकेट विश्वचषक रद्द

२०१८ साली होणार ७वा टी२० विश्वचषक आयसीसीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विश्वचषक २०२० मध्ये होण्याची शक्यता आहे.

आयसीसी सदस्य देशांपैकी बहुतेक देश २०१८ सालात वेगवेगळ्या देशांबरोबर क्रिकेट मालिका खेळणार असल्यामुळे हा विश्वचषक रद्द करण्याचा निर्णय आयसीसीला घ्यावं लागल्याचं बोललं जात आहे. एवढ्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकामुळे ही स्पर्धा घेणं अवघड असल्याचं कारण बोललं जात आहे.

टी२० विश्वचषक आजपर्यंत दक्षिण आफ्रिका (२००७), इंग्लंड(२००९), वेस्ट इंडिज(२०१०), श्रीलंका(२०१२), बांगलादेश(२०१४) आणि भारत(२०१६) या देशांनी आयोजित केला आहे. पुढील विश्वचषक दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया देशात होण्याचे संकेत दिले जात आहेत.

विश्वचषक रद्द होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सदस्य देशांपैकी जवळजवळ सर्वच देशांच्या स्वतःच्या लीग स्पर्धा आहेत. त्यामुळे सारखं आयोजन करून या विश्वचषकाकडे चाहते पाठ फिरवू शकतात.

दोन देशातील स्पर्धा या यजमान देशाला मजबूत पैसे मिळवून देतात. त्यात दौरा करणारा देश भारत असेल तर कोणताही देश अशा मालिकांना पसंती देतो.

भारतीय संघ पुढच्या वर्षी एकापाठीपाठ एक मालिका परदेशी भूमीवर खेळणार आहे. त्यात आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश आहे.

पुढची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात २०२१ साली होणार आहे तर मे-जून २०१९ ला इंग्लंडमध्ये ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. याचा अर्थ पुढील दोन वर्ष कोणतीही आयसीसीची स्पर्धा होणार नाही.