शिखर धवन, सुरेश रैना, आशिष नेहरा, हार्दिक पांड्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान नाही.

भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडण्याच्या अंतिम तारीख अर्थात २५ एप्रिल पर्यंत जरी भारतीय संघाची घोषणा केली नसली तरी एका महान माजी कर्णधाराने जरा वेगळाच संघ या दौऱ्यासाठी निवडला आहे. तो माजी खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आहे.

१ जून पासून सुरु होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा १५ १५ जणांच्या चमूमध्ये कोण असावे याचा काहीसा आश्चर्यजनक अंदाज मायकल क्लार्कने बांधला आहे. सध्या भारतात आयपीएल समालोचन करण्यासाठी आलेल्या क्लार्कच्या संघात भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन, मधल्या फळीतील सुरेश रैना, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि भारताचा विश्वचषकातील आणि आयसीसीच्या स्पर्धांमधील यशस्वी गोलंदाज आशिष नेहरा यांना जागा नाकारण्यात आली आहे.

केएल राहुल दुखापतग्रस्त असल्यामुळे रोहित शर्माचा सलामीला जोडीदार म्हणून शिखरकडे पहिले जात आहे. परंतु क्लार्कच्या मते त्याच्या ऐवजी रहाणेला त्या जागी संधी द्यावी. रहाणे हा स्विंग गोलंदाजीचा चांगला सामना करतो. भारताच्या गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात शिखर धवनने मोठी जबाबदारी पार पाडली होती.

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी क्लार्कने अनुभवाला प्राधान्य दिले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली तिसऱ्या, युवराज सिंग चौथ्या तर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीला क्लार्कने पाचव्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. युवराज,धोनी आणि कोहली सध्या आयपीएलमध्ये ठीकठाक प्रदर्शन करत आहेत.

क्लार्कने ६व्या जबदस्त लयीत असलेल्या मनीष पांडेला तर ७व्या क्रमांकासाठी अष्टपैलू खेळाडू महाराष्ट्रीयन केदार जाधवचे नाव सुचविले आहे.

फिरकी विभागात भारताच्या सध्याच्या आघाडीच्या अश्विन आणि जडेजाची निवड क्लार्क करतो.

वेगवान विभागात क्लार्क भुवनेश्वर कुमारवर विश्वास ठेवत त्याच्या तीनही प्रकारातील कामगिरीचा दाखला देतो. त्याला साथ देण्यासाठी या विभागात तो उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच नाव सुचवत.

 

मायकल क्लार्कचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली( कर्णधार ), युवराज सिंग, एमएस धोनी(यष्टीरक्षक ), मनीष पांडे, केदार जाधव, आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.