प्रो कबड्डी: सामना बरोबरीत पण गुजरात घरच्या मैदानावर अपराजित

प्रो कबड्डीमध्ये काल दुसरा सामना गुजरात फॉरचूनजायन्टस आणि बेंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. हा सामना बरोबरीत सुटला. गुजरातकडून सचिन, कर्णधार सुकेश हेगडे आणि महेंद्र राजपूत यांनी उत्तम कामगिरी केली. बेंगाल वॉरियर्सकडून मामणिंदर सिंग, भिपिंदर सिंग आणि दीपक नरवाल यांनी चांगला खेळ केला. भूपिंदर आणि दिपकच्या शेवटच्या काही मिनिटात उत्तम खेळामुळे हा सामना बरोबरीत सोडवण्यात बंगाल संघाला यश आले.

पहिल्या सत्रात बेंगाल संघाचा खेळ चांगला झाला. दोन्ही संघ १३ व्या मिनीटापर्यंत ७-७ असे बरोबरीत होते. १८ व्या मिनिटाला गुजरात संघाला ऑल आऊट करण्यात बेंगालला यश आले. सामन्यात बेंगालने १३-८ अशी बढत मिळवली. पहिले सत्र संपले तेव्हा बेंगाल १४-१० अश्या आघाडीवर होते.

दुसऱ्या सत्रात गुजरातने चांगली कामगिरी केली.दुसऱ्या सत्राच्या पहिल्या १० मिनिटात सुकेश हेगडेने गुजरातसाठी रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. याचा फायदा उचलत गुजरातने पिछाडी भरून काढली. दुसर्या सत्रात १३ व्या मिनिटाला सामना १९-१९ असा बरोबरीत आला.

१५ व्या मिनिटाला भूपिंदर बेंगालचा शेवटचा खेळाडू मैदानात रेड करण्यासाठी आला . त्याने या रेडमध्ये ३ गुण मिळवले आणि सामना २३-२१ असा बेंगालच्या बाजूने झुकवला. १७ व्या मिनिटात रेडला आलेल्या महेंद्र राजपूतने सुपर रेड केली. यामध्ये त्याने बंगालच्या शेवटच्या तिन्ही खेळाडूंना बाद केले. तीन खेळाडू बाद केल्याचे तीन गुण तर ऑल आऊटचे दोन गुण असे पाच गुण या रेडमध्ये मिळाले. सामना आता २६-२३ असा गुजरातच्या बाजूने झुकला होता.

पुढील रेडमध्ये दिपकने २ गुण मिळवत सामना २५-२६ असा केला. बंगाल गुणांच्या पिछाडीवर होते. शेवटच्या २ रेड गुजरातने एम्प्टी घालवल्या. सामन्यातील शेवटच्या रेडमध्ये दिपकने बेंगालसाठी एक गुण मिळवत हा सामना २६-२६ असा बरोबरीत केला. हा सामना या मोसमातील पाचवा बरोबरीत सुटलेला सामना ठरला आहे.

गुजरातने घरच्या मैदानावर खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत तर शेवटचा सामना बरोबरीत सोडवला आहे. पाचव्या मोसमात घरच्या मैदानावर अपराजित राहिलेला गुजरात पहिला संघ ठरला आहे. या सामन्यानंतर गुजरात फॉरचूनजायन्टसचे ९ सामन्यात ३६ गुण झाले आहेत. ते ‘झोन ए’ मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.