तब्बल ६ नवे संघ पुढील वर्षी रणजी स्पर्धा खेळणार

पुढील वर्षीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत ईशान्येकडील ६ राज्यांचा सहभाग असेल अशी घोषणा बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी केली आहे.

मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश ही ती राज्य असून १ राज्य १ संघटना या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या अटीची भारतीय क्रिकेट बोर्डाने एकप्रकारे पूर्तताच केली आहे.

यावेळीचा रणजी ट्रॉफी कार्यक्रम आधीच घोषित झाला आहे. यावेळचा रणजी हंगाम ६ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून यात मात्र सर्व पारंपरिक संघ सहभागी होणार आहे. यावेळी जरी मुख्य संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसले तरी वेगवेगळ्या वयोगटातील या सहा राज्यातील संघ मात्र ह्याच वर्षीपासून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

ईशान्य भारतातून यापूर्वी केवळ दोन संघ अर्थात आसाम आणि त्रिपुरा हे संघ खेळत होते. हे दोनही संघ अनेक वर्ष बीसीसीआयचे सदस्य आहेत.