१९ वर्षाखालील विश्वचषकातील ३ स्टार पहिल्याच सामन्यात फ्लॉप

भारताला ६ वर्षांनी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देण्यात ज्या दोन खेळाडूंनी सर्वात मोठा हातभार लावला ते पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात अपयशी ठरले आहे.

काल झालेल्या हरियाणा विरुद्ध पंजाब सामन्यात शुभमन गिलने पंजाबकडून सलामीला येत २६ चेंडूत २५ तर आज पंजाब विरुद्ध ओडिशाविरुद्ध सामन्यात सलामीला येत ४ चेंडूत ४ धावा केल्या. हे दोन्ही सामने अलूर, कर्नाटक येथे झाले.

शुभमनचा १९ वर्षाखालील विश्वचषकातील संघासहकारी अभिषेक शर्मालाही पंजाबकडून खेळताना ४ षटकांत २२ धावा देताना एकही विकेट घेता आली नाही. शिवाय फलंदाजीतही त्याने केवळ २ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याला ओडिशा विरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे.

मुंबईकर स्टार आणि १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉलाही आज मुंबई विरुद्ध तामिळनाडू सामन्यात अपयश आले. त्याने सलामीला येत मुंबईकडून ९ चेंडूत ९ धावा केल्या. मुंबईला सध्या ४० षटकांत १३७ धावांची गरज असून त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले आहे.

विश्वचषकात अंतिम सामन्यात खेळलेल्या संघातील खेळाडूंपैकी पृथ्वी शॉ, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यांच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली परंतु त्यांना अजूनतरी त्याचा फायदा उचलता आला नाही.