जागतिक क्रमवारीत ४था असूनही जोकोविचला विम्बल्डनमध्ये दुसरे मानांकन

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन स्पर्धेसाठी दुसरे मानांकन मिळाले आहे. जोकोविचप्रमाणेच ७वेळचा विजेता रॉजर फेडररलाही याचा फायदा झाला.

अपेक्षेप्रमाणे स्पर्धेत ब्रिटनचाच अँडी मरे अग्रमानांकित असून महिलांमध्ये जर्मनीची अँजेलीक कर्बरला अग्रमानांकन मिळालं आहे.

बुधवारी ऑल इंग्लंड क्लबवर २०१७च्या विम्बल्डन स्पर्धेचा ड्रॉ घोषित झाला.
विम्बल्डन हे अन्य ग्रँड स्लॅमपेक्षा स्पर्धेसाठी मानांकन देण्यात वेगळे नियम वापरत. पुरुष एकेरीत खेळाडूंचा ग्रास कोर्टवरील आधीच फॉर्म हा या स्पर्धेत पहिला जातो. तसेच मागील दोन वर्षातील विम्बल्डनमधील कामगिरीही विचारात घेतली जाते. ह्या पद्धतीला टेनिसची सर्वोच्च संस्था असणाऱ्या एटीपीकडूनही मान्यता मिळाली आहे.

ह्याच महिन्यात फ्रेंच ओपन जिंकणारा आणि जागतिक क्रमवारीत दुसरा असणाऱ्या राफेल नदालला या स्पर्धेत चौथ मानांकन मिळालं आहे. यासाठी त्याचा गेल्या दोन वर्षातील या स्पर्धेतील तसेच ग्रास कोर्टवरील फॉर्म कारणीभूत ठरला आहे.

३१ वर्षीय नदालकडे दोन विम्बल्डन विजेतेपद (२००८, २०१०) असूनही २०११ नंतर या स्पर्धेत त्याला ४थ्या फेरीच्या पुढे जाता आलेले नाही.

जागतिक क्रमवारीत पाचवा असणाऱ्या फेडररला स्पर्धेत तिसरं मानांकन मिळाल्यामुळे उपांत्यफेरीपर्यंत त्याला कोणत्याही मोठ्या खेळाडूचा सामना करावा लागणार नाही. तर जागतिक क्रमवारीत तिसरा असूनही स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काला पाचवे मानांकन मिळाले आहे.

महिलांची मानांकने ही पूर्णपणे जागतिक क्रमवारीनुसार आहेत.