६वेळचा विजेता नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, २१ वर्षीय खेळाडूने केले पराभूत

मेलबर्न । नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०१८मधून बाहेर पडला आहे. त्याला ह्येन चुंग या दक्षिण कोरियाच्या २१ वर्षीय खेळाडूने पराभूत केले.

३ तास २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात सामन्यात ह्येन चुंगने जोकोविचवर ७-६, ७-५, ७-६ असा विजय मिळवला. हा संपूर्ण सामना ७ महिन्यानंतर पदार्पण करणाऱ्या ६वेळच्या विजेत्या जोकोविचचा कस पाहणारा होता. त्याच्या प्रत्येक फटकाचे २१ वर्षीय ह्येन चुंगकडे उत्तर होते.

काहीवेळा तर सामन्यात जोकोविच चेंडूजवळही पोहचू शकला नाही यावरून त्याच्या खेळाचा अंदाज येतो.

ह्येन चुंग हा ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला पहिला दक्षिण कोरियाचा खेळाडू बनला आहे. त्याचा सामना आता अमेरिकेच्या तेँनीस सॅन्डग्रेनशी होणार आहे.

३० वर्षीय जोकोविचने पहिल्या सेटनंतरच मेडिकल ब्रेक घेतला होता आणि त्याच्या खेळात त्याची दुखापत दिसत होती. या पराभव झालेल्या सामन्यातही जोकोविचने ह्येन चुंगचा चांगलेच झगडायला लावले.

या सामन्यांबरोबर ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले. ते असे
उपांत्यपूर्व फेरी सामना १: राफेल नदाल विरुद्ध मारिन चिलीच
उपांत्यपूर्व फेरी सामना २: ग्रिगोर दिमित्रोव्ह विरुद्ध कॅले एडमंड
उपांत्यपूर्व फेरी सामना ३: ह्येन चुंग विरुद्ध तेँनीस सॅन्डग्रेन
उपांत्यपूर्व फेरी सामना ४: रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच