एनआरएमची दुसरी वर्षपूर्ती; सायकलिस्टला मिळाले 4 प्लॅटिनम रायडर्स

नाशिकच्या हवेत जादू : आयर्नमॅन रविजा सिंगल

नाशिक: नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उद्यमी उपक्रम असलेल्या एनआरएम सायकलिंग अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची उत्साहात सांगता झाली. दोन वर्षात एक महिन्यात एक याप्रणे 24 राईड्स पूर्ण झाल्या असून यामध्ये नाशिकला सलग 12 राईड्स पूर्ण करणारे रवींद्र चांदोरे, शिशिर आचार्य, पूर्वांश लखनानी, धर्मराज जगधाने असे 4 प्लॅटिनम रायडर्स मिळाले आहेत. तर एकूण 18 सिल्वर (सलग 3 राईड्स), 7 गोल्ड (सलग 6 राईड्स), 4 डायमंड (सलग 9 राईड्स) अशी पदके सायकलीस्टने मिळवली.

एनआरएमच्या दुसऱ्या पर्वाची अखेरची राईड पूर्ण झाल्यानंतर रविवारी (दि. 9) झालेल्या समारंभात पदक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे पोलीस आयुक्त आयर्नमॅन डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्वात तरुण आशियायी महिला आयर्नमॅन ठरलेली रविजा सिंगल, नाशिकचा पहिला आयर्नमॅन अमर मियाजी, आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, डॉ. पिंपरीकर, नाशिक सायकलीस्टचे अल्ट्रा सायकलीस्ट डॉ. हितेंद्र महाजन, लेफ्ट. कर्नल भारत पन्नू, नाशिकचे आयर्नमॅन मशीन मुस्तफा सर, नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि एनसीएफ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविजा सिंगल हिने आपले आयर्नमॅन स्पर्धेतील अनुभव तरुणांना सांगितले. नाशिकमध्ये नाशिककर सोबत असल्यामुळेच हे शक्य झाले असून नाशिकच्या हवेत वेगळीच जादू असल्याची भावना रविजाने व्यक्त केली. या स्पर्धात सुरुवातीला अपयश मिळाल्यानंतर मिळालेलं हे यश खूप काही शिकवून गेले आहे. सोशल मिडीयाच्या पलीकडे खूप मोठे जग असून आपल्यातील नकारात्मकता काढून टाकल्यास कुठलेही यश आपल्याला मिळू शकते असा विश्वास तिने व्यक्त केला.  

यावेळी डॉ. सिंगल म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनशी जोडला गेलो आहे. इथे खूप उत्साही लोक आहेत. जसपालसिंग विर्दी यांच्या संपर्कात आल्यावर सायकलिंगला खरी सुरुवात केली. आणि गेल्या दोन वर्षात अनेक व्यासपीठावर उपस्थित सर्वांनीच आपापल्या परीने योगदान देत नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे. फ्रान्समधील आयर्नमन स्पर्धेतील आपला अनुभव सांगताना डॉ. सिंगल म्हणाले की अनेक तरुण या स्पर्धेत सहभागी झाले मात्र अनेकांनी अर्ध्यावर रेस सोडली. अशावेळी कितीही प्रेरणा मिळत राहिली तरी निश्चय पूर्ण करण्याचा कडवटपणा असेल तर आपणास कोणीही रोखू सहकार नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

लेफ्ट. कर्नल भारत पन्नू यांनी सायकलिंगमुले वेळेचे नियोजन करण्यास अधिक शिकलो. नाशिक सायकलीस्टशी जोडले गेल्यानंतर मी खऱ्या अर्थाने नाशिककर झालो असून आर्मी कॅम्पसच्या बाहेरही माझे अनेक मित्र आहेत. दोन वर्षासाठी ठेवलेले लक्ष्य केवळ चार महिन्यात पूर्ण झाले. नाशिकमधील अनुभवी खेळाडूंमुळे गोष्टी सोप्या होत गेल्या. इ पुढील वर्षी एकट्याने रेस अॅक्रोस अमेरिका अर्थात रॅम स्पर्धा पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, अमर मियाजी यांनीही आपापले अनुभव नवख्या सायकली स्ट समोर मांडले. डॉ. महाजन यांनी एनआरएमचा इतिहास सांगताना जसपालच्या आठवणींना उजाळा दिला. आणि कदाचित जसपालच्या घटनेवरून प्रत्येकाने सीपीआर प्रशिक्षण घेणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. डॉ. पिंपरीकर यांनी मोठ्या आणि जास्त अंतराच्या स्पर्धांत सहभागी होताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत सायकलीस्टला मार्गदर्शन केले.

एनआरएमच्या दुसऱ्या पर्वाची धुरा नीता नारंग, सोफिया कपाडिया, नितीन कोतकर, अनिकेत झवर, अथर्व शिवडेकर आणि त्यांच्या टीमने सांभाळली. एनआरएम सायकलिंगच्या दुसऱ्या पर्वात अनेक सायकलपटू नव्याने या उपक्रमात जोडले गेले आहेत. नाशिक सायकलीस्ट सदस्यांच्या सहकार्याशिवाय हा पल्ला गाठणे शक्य नव्हते. आजवर 870 हून अधिक सायकलीस्टने किमान एकदा एनआरएम राईड पूर्ण केली असल्याची माहिती त्यांनी आपल्या मनोगतात दिली. एनआरएम सायकलिंग तिसऱ्या पर्वात आणखी मोठी चळवळ बनणार असून पुढे काम करणाऱ्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.