अजिंक्य रहाणेवर होतोय का अन्याय ?

‘कुठेही नाव ठेवायला जागा नाही’ असे विशेषण खूप कमी व्यक्तींना किंवा गोष्टींना वापरले जाते. असाच एक व्यक्ती म्हणजे मुंबईकर अजिंक्य रहाणे. कुणाच्या कोणत्याही टीकेला किंवा प्रोत्साहनाला तेवढंच शांतपणे उत्तर देणारा हा खेळाडू. कधीही कोणत्या चुकीच्या गोष्टी किंवा वाद यावरून रहाणेच नाव आजपर्यंत चर्चेत आलं नाही.

मराठी मुलगा म्हणून या खेळाडूला महाराष्ट्रीयन चाहत्यांच कायम विशेष प्रेम मिळत आलं आहे परंतु एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून त्यापेक्षा जास्त लोक त्याचे चाहते आहेत. क्रिकेट हा जेंटलमॅनचा खेळ अशी एक खास ओळख आह. सध्याच्या भारतीय संघातील रहाणे हा या वर्गातील सर्वात वरच्या क्रमांकावरील विद्यार्थी आहे. सरळ बॅटने फटके मारायची परंपरा तो नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या मातीतून शिकला आहे.

एवढं सगळं असूनही गेल्या सहा वर्षांच्या वनडे कारकिर्दीत हा खेळाडू सामने खेळला आहे जेमतेम ७९. एक माजी कर्णधार होता ज्याला रहाणेच्या भारतीय उपखंडात एकेरी दुहेरी धावा घेण्यावर विश्वास नव्हता तर दुसऱ्याला संघातील चांगल्या खेळाडूंपेक्षा मैत्री आणि स्टाईल जास्त महत्वाची वाटते. भारतीय खेळाडू परदेशात कायम खराब खेळतात आणि भारत किंवा उपखंडात चांगली कामगिरी करतात असा आरोप जगातीलच काय भारतातील चाहते देखील कायम करत असतात. परंतु हे जर खरे असेल तर रहाणे हा भारतीय उपखंडातील पहिला असा खेळाडू असेल ज्याच्यावर याच्या उलट आरोप होतात की हा भारतात खराब खेळतो परंतु परदेशी भूमीवर चांगली कामगिरी करतो.

असे करताना रहाणेला याकाळात भारतात किती सामने खेळायला मिळाले याचा कुणी विचार करत नाही. गेल्या सहा वर्षात हा खेळाडू भारतात केवळ २९ वनडे सामने खेळला आहे. त्यातही त्याने ३१.४४च्या सरासरीने ९१२ धावा केल्या आहेत. ज्या भारतीय फलंदाजांनी रहाणेच्या पदार्पणापासून केलेल्या ६व्या क्रमांकाच्या सार्वधिक धावा आहेत. याच काळात भारतीय संघ भारतात ४८ सामने खेळला म्हणजे १७ सामन्यात रहाणेला संघात स्थानच देण्यात आलं नाही.

याच कालावधीमध्ये भारतीय संघ एकूण १४४ वनडे सामने खेळला त्यात रहाणे केवळ ७९ सामन्यात भारतीय संघाचा भाग होता. म्हणजेच ५०% सामन्यात तुम्ही त्याला संधीच दिलेली नाही. बर ही संधी देताना तुम्ही त्याला एक सामन्यात घेता दुसऱ्यात खाली बसवता. एकदाही त्याला पूर्णवेळ संधी देण्यात आली नाही जर तुम्हाला त्याला संधीच द्यायची नसेल तर त्याला राखीव खेळाडूंमध्ये तरी कशाला स्थान देता त्यापेक्षा तो कसोटी आणि देशातंर्गत क्रिकेट खेळेल. रोहित शर्मा कितीही वाईट फॉर्ममधून गेला तरी त्याच संघातील स्थान अबाधित राहतं. शिखर धवन एखाद्या मालिकेत चालून गेला की पुढे त्याला ४-५ मालिका काही भीती राहत नाही परंतु रहाणेची वेळ येते तेव्हा पहिला सामना संघात, दुसरा बाहेर, तिसरा ५व्या क्रमांकावर असच काहीतरी असत. संघातील त्याची जागा सुद्धा फिक्स नसते. आणि अपेक्षा असतात १००च्या स्ट्राइक रेटने धावा करण्याच्या.

४० कसोटी सामन्यात ४७.६१च्या सरासरीने या खेळाडूने २८०९ धावा केल्या आहेत. ४७.६१ ही सरासरी ही मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूसाठी किती योग्य आहे हे लक्ष्मण किंवा गांगुलीचा कार्यकाळ अनुभवलेले खेळाडू नक्की सांगू शकतात. मग वनडे सामन्यात रहाणेला स्थान द्यायला माशी कुठे शिंकते? जो फलंदाज विश्वचषक किंवा परदेशी भूमीवर जबरदस्त कामगिरी करतो त्याला तुमच्या संघात ११ खेळाडूंमध्ये साधी जागा नसावी?

भारतीय संघात सध्याच्या घडीला २-३ खेळाडू तरी असे आहेत की ज्यांना रणजी संघातसुद्धा स्थान टिकवणं मुश्किल आहे. तरीही ते संघात आहेत परंतु एक खेळाडू जो सतत सातत्यपूर्ण खेळ करतो त्याला जागा मिळत नाही. म्हणे केएल राहुल विराटच्या मर्जीतील खेळाडू आहे. भारतीय संघ विराटच्या मर्जीवर न चालता प्रतिभेवर चालायला हवा. निवड समिती अध्यक्षांना तर नक्की काय पाहिजे हे त्यांनाही ठाऊक नाही. संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोटेशन पद्धतीचा अवलंब करून संघातून बाहेर बसवलं जात मग रहाणेच्या वेळी का कोणत्या सलामीवीराला खाली बसवलं जात नाही की निवड समितीला आपल्या मर्जीतील खेळाडू पुन्हा रहाणेने चांगली कामगिरी केली म्हणून पुन्हा संघात येईल की नाही याची भीती वाटते?

रहाणेला संघात न घेण्याचं कारण म्हणजे त्याचा संथ खेळ असे सांगितले जाते. ज्या संघात रोहित, शिखर, विराट, केदार जाधव, हार्दिक पंड्या, एमएस धोनी, मनीष पांडे सारखे वेगवान धावा जमा करणारे खेळाडू असताना एक संथ खेळून डाव सावरणारा खेळाडू चालत नाही. की वनडे क्रिकेट फक्त वेगवान खेळून आणि आडवेतिडवे फटके मारून जिंकलं जात? विश्वषक २०१९ हा इंग्लंड देशात आहे. २०१५ विश्वचषकात संधी मिळाली तेव्हा रहाणेने चांगली कामगिरी केली आहे. नाहीतर प्रतिभा असूनही संधी मिळाली नाही म्हणून रहाणेचा मुरली विजय होण्यासाठी वेळ लागणार नाही.

ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला आहे याच वेळी भारतीय संघ व्यवस्थापनाने रहाणेबद्दल काय तो विचार करावा. नाहीतर तो वनडे संघातील एक कायमस्वरूपी राखीव खेळाडू बनल्याशिवाय राहणार नाही.