ISL: फॉर्म हरपलेल्या केरला ब्लास्टर्सची घरच्या मैदानावर बेंगळुरुशी लढत !

कोची | हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) दक्षिण डर्बीत रविवारी केरळा ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात मुकाबला होत आहे. यंदा लिगमध्ये बेंगळुरूमुळे दक्षिणेतील तिसऱ्या संघाची भर पडली आहे. बेंगळुरू, चेन्नईयीन आणि ब्लास्टर्स यांच्यातील लढतींना डर्बी असे संबोधले जाते. ब्लास्टर्स फॉर्मसाठी झगडत आहे. बेंगळुरूविरुद्ध त्यांना खेळ उंचावणे अनिवार्य आहे. 

लिगमधील चुरस पाहता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील. डर्बीमुळे त्यांची जिद्द वाढलेली असेल. ब्लास्टर्सचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन म्हणाले की, आणखी खास महत्त्वाचा सामना अशा दृष्टीने आम्हाला पाहावे लागेल. यास डर्बीची किनार आहे. ही स्थिती चांगली आहे. चाहत्यांची डर्बीची चर्चा आम्ही ऐकली आहे. त्यामुळे आम्ही आतुर झालो आहोत. 

बेंगळुरूला विजय मिळाल्यास गुणतक्‍त्यात 15 गुणांसह दुसरे स्थान गाठता येईल. दुसरीकडे ब्लास्टर्सला दुसऱ्याच विजयाची प्रतीक्षा असेल. गतउपविजेता ब्लास्टर्स यंदा झगडतो आहे. सहा सामन्यांत एकमेव विजय, चार बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. सात गुणांसह हा संघ आठव्या स्थानावर आहे. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्यांची वाटचाल आणखी बिकट झाली आहे. स्टार स्ट्रायकर दिमीतार बेर्बातोव याचा सहभाग अद्याप अनिश्‍चित आहे. 

त्याच्या तंदुरुस्तीविषयी म्युलेस्टीन म्हणाले की, त्याने आज एक दिवस चांगला सराव केला आहे, पण आम्हाला त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घ्यावा लागेल. आपल्याला वाट पाहावी लागेल. 

अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने हिरो आयएसएलमध्ये पदार्पणात प्रभावी प्रारंभ केला, पण त्यानंतर त्यांची कामगिरी खालावली आहे. सलग दोन पराभव पत्करल्यानंतर बेंगळुरूसमोर नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सला गगनभेदी जयघोषात पाठिंबा देणाऱ्या यलो आर्मीसमोर खेळण्याचे आव्हान आहे. 

पत्रकार परिषदेला रोका यांच्याऐवजी सहाय्यक प्रशिक्षक नौशाद मुसा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, स्पर्धा खडतर झाल्यामुळे आम्ही दोन सामने गमावले. आम्ही मोसमाचा प्रारंभ फार लवकर केला. जुलैमध्येच आम्ही सुरवात केली. एएफसी करंडक आणि इतर स्पर्धांत आम्ही खेळलो. हे आमच्यासाठी चांगले होते. इतर संघांमध्ये आता समन्वय निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वाटचाल खडतर झाली आहे. आम्ही बरेच सामने बाहेरील मैदानांवर खेळत आहोत. 

ब्लास्टर्सविरुद्धचा सामना बराच खडतर असेल. त्यांचा खेळ चांगला होत आहे. याशिवाय प्रेक्षकांचा पाठिंबा सुद्धा त्यांना मिळेल, असेही मुसा यांनी नमूद केले.