ओम् कबड्डी प्रबोधिनीचे कबड्डी प्रशिक्षण शिबीर यशस्वी संपन्न

“ध्येयपूर्तीसाठी एकलव्य व्हा” असे आव्हान माजी महापौर व जेष्ठ कबड्डी खेळाडू महादेव देवळे यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या कबड्डी प्रशिक्षण समारोप प्रसंगी काढले. ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या विद्यमाने दि.०८ ते १४एप्रिल २०१९ या कालावधीत नवोदित व होतकरू मुला-मुलींकरिता कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-लालबाग येथील मनोरंजन मैदानावर घेण्यात आलेल्या या शिबिरात वय वर्ष १६ च्या आतील ८४ मुले व २६मुलींनी सहभाग घेतला होता. या मुलांना मार्गदर्शन करताना ते पुढे असेही म्हणाले की, खेळातील एकाग्रहता आणि मेहनत यामुळे तुम्ही मोठे खेळाडू होऊ शकता.

या शिबिरात अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माया मेहेर, सिताराम साळुंखे, तारक राऊळ (दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), एन आय एस प्रशिक्षक जीवन पैलकर, गोपीनाथ जाधव, राजू कवळे, कृष्णा काताळे, सौ. जगताप, रमेश लांबे, फुटबॉलचे प्रशिक्षक लक्ष्मण राव, परवेज शेख, फ्रेडी यांनी मार्गदर्शन केले. खेळताना दुखापत होऊ नये आणि ती झाली तर कोणती काळजी घ्यावी याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन फिजियोथेरोपीचे डॉ. शैलेश शेलार यांनी केले. पुणेरी पलटण व जयपूर पिंक पँथरचे सहाय्यक प्रशिक्षक राहिलेले प्रकाश (बट्ट्या) साळुंखे यांनी खेळताना खेळाडूंची मानसिक संतुलन आणि देहबोली कशी असावी यावर मार्गदर्शन केले. या शिबिरात उत्कृष्ट खेळाबरोबरच शिस्तबद्ध व वक्तशीरपणा असलेल्या चार खेळाडूंना “स्व.सदानंद घंदाडे” यांच्या स्मरणार्थ रोख रु.पाचशे (₹ ५००/-) शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. १)कुमारी सिद्धी अभिमन्यू राणे, २) कुमार श्रावण संदीप भांडे, ३)शुभम अशोक सावंत, ४)रोहित देवकरण अहिर ही ती चार मुले.

रविंद्र करमरकर, छाया देसाई, भारती विधाते-भुजबळ(सर्व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), जयवंत परब, जगन्नाथ चव्हाण, अभिमन्यू पालेकर,चंद्रकांत पिरवरे, अनिता सावंत, पुष्पां महाडेश्वर,राजश्री पवार, साचिन आयरे, अरुण घोगले, दत्ताराम पारकर, संध्या ठाकूर, विद्यापीठाचे पांडे सर व राणे, अर्जुन नर आदी राष्ट्रीय खेळाडू व संघटकांनी सदिच्छा भेट देऊन मुलांना शुभेछा दिल्या. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अजय पेंडूरकर,दयानंद घंदाडे, एल एस कामत, अनिल नागवेकर, अशोक परब, नंदू बोबाटे, आबा मोरे व महर्षी दयानंद स्पोर्ट्सच्या मुलींनी अथक परिश्रम घेतले.