आजच्या दिवशी लाराने केली होती प्रथमश्रेणी क्रिकेटमधील संस्मरणीय खेळी

आजच्या दिवशी चोवीस वर्षांपुर्वी ब्रायन लाराने आपल्या कारकिर्दीतील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील संस्मरणीय खेळी केली होती. जगाला विश्वास बसणार नाही अशी ५०१* धावांची नाबाद खेळी केली.

लाराने काऊंटी चॅम्पियन्सशिपमध्ये वॉरविकशायरकडून खेळताना डरहॅमविरूध्द बर्मिंगहममध्ये ही खेळी केली होती. यात त्याने ७२ वेळा चेंडू सीमापार लावला. ४२७ चेंडूंच्या खेळीमध्ये ६२ चौकार आणि १० षटकार लगावले.

लाराने खास आपल्या शैलीत ज़ॉन मॉरिसला कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह करत ५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. हनीफ मोहम्मद यांचा ४९९ धावांचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील विक्रम लाराने या खेळीद्वारे मोडीत काढला.

लाराला या खेळीदरम्यान दोनदा जीवनदान मिळाले. १२ धावांवर असताना त्रिफाळचीत झाला परंतु चेंडू नो-बॉल निघाला, १८ धावांवर खेळत असताना यष्टीरक्षक ख्रिस स्कॉटने झेल सोडला.

लाराने २००४ मध्ये ऍंटिग्वा कसोटीत इंग्लंडविरूद्ध नाबाद ४०० धावांची विक्रमी खेळी केली होती. ही खेळीही कसोटीमधील एका डावातील सर्वोच्च खेळी आहे.