तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….

बरोबर आज ७ वर्षे झाले. भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला होता. 

विशेष म्हणजे यजमान देशाने आपल्याच देशात प्रथमच विश्वचषक जिंकला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघाला श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने प्रथम गोलंदाजीला आमंत्रित केले. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडीअमवर झालेल्या या सामन्यात माहेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर लंकेने ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. वानखेडेवर ह्या धावा नक्कीच त्यावेळी एक कठीण लक्ष होत्या.

परंतु सेहवाग आणि सचिनसारखे दिग्गज खेळाडू मैदानात परतले असताना आपण वेगळेच खेळाडू असल्याचं गंभीरने दाखवुन दिलं. टिच्चून फलंदाजी करताना त्याने १२२ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. 

त्याला २३ वर्षीय विराट कोहलीने ४९ चेंडूत ३५ धावा काढत चांगली साथ दिली. 

त्यानंतर मैदानात आलेल्या जय-विरू अर्थात माही-युवी जोडीने कोणतीही पडझड होवू न देता संघाला विजय मिळवून दिला. त्यात धोनीने ७९ चेंडूत नाबाद ९१ तर युवराजने २४ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. 

भारतीय संघ १० चेंडू आणि ६ विकेट राखून जिंकला. सामना धोनीने षटकार खेचत आपल्या नेहमीच्या स्टाईलने संपवला होता. त्यालाच या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर या संपुर्ण मालिकेत अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या  युवराजला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. 

भारतीय संघाला तब्बल २८ वर्षांनी एवढ्या मोठ्या यशाची चव चाखायला मिळाली होती. त्यामुळे तो विजय, ते मैदान आणि तो षटकार भारतीय चाहते कधीही विसरणार नाहीत.