जाणून घ्या सचिनचा कसोटी रेकॉर्ड मोडू शकणाऱ्या ह्या खेळाडूबद्दल!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील असा खेळाडू आहे की ज्याने केलेली क्रिकेट रेकॉर्डस् मोडणे केवळ अशक्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कुमार संगकारा आणि जॅक कॅलिस या दोन खेळाडूंबद्दल ही नेहमीच चर्चा व्हायची. परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा वय किंवा अन्य कारणामुळे हे खेळाडू मागे पडले.

परंतु गेली ३-४ वर्ष ज्या खेळाडूचे नाव सतत सचिनच्या कसोटी विक्रमाशी जोडले जात आहे तो आहे इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक. ३२ वर्ष आणि २३७ दिवस वय असणारा हा खेळाडू सचिनच रेकॉर्ड का मोडू शकतो याची अनेक कारणे आहेत.

वय हेच मुख्य कारण
त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे या खेळाडूच वय. ३२व्या वर्षी या खेळाडूने जो काही कारनामा केला आहे तो कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला जमला नाही. या वयात त्याच्या नावावर ११५६८ धावा आहेत. दिग्गज कसोटीपटू हे अगदी वयाच्या ४०व्या वर्षीही क्रिकेट खेळताना आपण पहिले आहे.

अफलातून फॉर्म:
जेमेतेम ११ वर्षाच्या कारकिर्दीत हा खेळाडू कधीही जास्त काळ खराब फॉर्ममध्ये राहिला नाही. ४६.३३ ची सरासरी राखून असणारा हा सलामीवीर कित्येक कसोटी मालिकेत संघाला एकहाती सामना जिंकून देत आहे. भारतात येऊन भारताला हरवणारा हाच तो कर्णधार. १४५ सामन्यात ३१ शतके आणि ५५ अर्धशतके या खेळाडूच्या नावावर आहेत.

इंग्लंड संघ खेळत असलेले सामने.:
कूकच्या पदार्पणापासून आजपर्यंत सार्वधिक कसोटी सामने खेळलेला देश जर कोणता असेल तर तो आहे इंग्लंड. या कालावधीत इंग्लंड तब्बल १४६ कसोटी सामने खेळला असून त्यात कूकने १४५ कसोटीमध्ये भाग घेतला आहे. अन्य देश जसे की भारत (१२२), ऑस्ट्रेलिया(१२४), दक्षिण आफ्रिका(१०९) आणि श्रीलंका(१०५) हे देश केवळ १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकले आहेत.

इंग्लंड हा देश वर्षाला सरासरी १३ ते १४ कसोटी सामने गेली ११ वर्ष खेळत आहे. पुढील ३-४ वर्ष कूक जर ह्याच सरासरीने खेळत राहिला आणि इंग्लंड एवढेच सामने दरवर्षी खेळत राहिली तर हे रेकॉर्ड मोडणं कूकसाठी नक्कीच अवघड नाही.

इतिहास कूकच्या बाजूने
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा कोणताही खेळाडू ३६ वयापूर्वी निवृत्त झाला नाही. सचिन(४०-४१), रिकी पॉन्टिंग(३७), कॅलिस(३७), राहुल द्रविड(३८), संगकारा(३७), लारा(३७), चंद्रपॉल(४१) हे खेळाडू अगदी ३५-३६ वयातही चांगली सरासरी राखून क्रिकेट खेळत होते. त्यामुळे ३३ वर्षीय कूकच्या बाजूने हा मोठा इतिहास आहे.

एकदिवसीय सामने:
११ वर्षांच्या कारकिर्दीत कूक जेमतेम ९२ एकदिवसीय सामने खेळला आहे. आजकाल क्रिकेटपटू कारकीर्द लांबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटच्या कोणत्यातरी एकाच प्रकारात खेळतात. कूक तर अगदी पहिल्यापासून करत आला आहे. मोठ्या प्रमाणावर कसोटी क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून ४ हात दूरच आहे. अनेकवेळा त्याची या प्रकारासाठी संघात निवडही झाली नाही. याचा मोठा फायदा कूकला कसोटी कारकीर्द वाढविण्यासाठी होणार आहे.

क्रिकेटमध्ये जर-तरला नसते महत्व:
क्रिकेट हा खेळ असा आहे की जर तरला यात अजिबात स्थान नाही. त्यामुळे कूककडून सचिनचा विक्रम मॉडेलच असं स्वतः कूकही सांगू शकत नाही. परंतु क्रिकेटमधील सरावात महत्वाची गोष्ट असणारा फॉर्म, वय आणि दुखापतग्रस्त न होणे हा इतिहास आणि वर्तमान नक्कीच कूकच्या बाजूने आहे.