एका मोसमानंतर मुंबईत रंगणार आयएसएलची ड्रीम फायनल

मुंबई । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नेहमीच अनपेक्षित संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यातही बाद फेरीत कोणतेही निकाल लागू शकतात. अशावेळी एफसी गोवाने मुंबई सिटी एफसीवर अॅग्रीगेटनुसार 5-2 असा विजय मिळविला. त्यामुळे सर्वांना अपेक्षित असलेली एफसी गोवा विरुद्ध बेंगळुरू एफसी अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी रंगेल. गेल्याच मोसमात असा सामना व्हावा अशी फुटबॉलप्रेमींची इच्छा होती. यावेळी मुंबईत यजमान संघाच्या गैरहजेरीत ही लढत रंगेल.

या घडीला आयएसएलमध्ये बेंगळुरू आणि गोवा हे दोन सर्वोत्तम संघ आहेत यात कोणतीही शंका नाही. गेल्या मोसमातही हे दोन संघ आकर्षक खेळामुळे लोकप्रिय ठरले होते. त्यावेळी एफसी गोवा संघ चेन्नईयीन एफसीकडून हरला. त्यामुळे ड्रीम फायनल साकार होऊ शकली नव्हती. यावेळी बेंगळुरूने उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्याच्या सामन्यात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचा कडवा प्रतिकार मोडून काढला. त्यामुळे तटस्थ चाहत्यांना अपेक्षित असलेली निर्णायक लढत नक्की झाली.

सर्जिओ लॉबेरा यांचा गोवा विरुद्ध कार्लेस कुआद्रात यांचा बेंगळुरू अशी लढत 17 मार्चचा दिवस संडे ब्लॉकबस्टर ठरवेल. लॉबेरा यांनी सांगितले की, उपांत्य फेरीतील दोन सामन्यांत मिळून 180 मिनिटे खेळल्यावर जो संघ आगेकूच करतो तो त्या पात्रतेचा असतो. दोन्ही संघांनी पूर्ण मोसमात चांगली कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात आम्ही प्रेक्षकांसाठी चांगला खेळ प्रदर्शित करू. आम्ही करंडक जिंकू शकू अशी आशा आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांना आयएसएल करंडक जिंकता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रेरणेची बाब आहे.
कुआद्रात यांनी सांगतिले की, सर्वच फायनल स्पेशल असतात. बरेच दडपणही असते. आम्ही आमच्या डावपेचांनुसार खेळू. आम्ही शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज आहोत. फुटबॉलच्या खेळात सामन्याचे पारडे फिरेल अशा अनेक गोष्टी घडत असतात.

साखळीत हे दोन्ही संघ पहिल्या दोन क्रमांकावर होते. त्यांचे गुण समान होते, पण साखळीतील प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या सरस कामगिरीमुळे बेंगळुरू अव्वल राहिले.

गोव्याने यंदा साखळीत 42 गोल करताना प्रतिस्पर्ध्यांना गारद केले, पण बेंगळुरू सुद्धा फार पिछाडीवर नाही. त्यांच्या खात्यात 35 गोल आहेत.

आक्रमण हे दोन्ही संघांच्या धोरणाचा मुख्य भाग आहे. दोन्ही प्रशिक्षक आघाडीवर खेळण्यास प्राधान्य देतात. अनेक संघांनी प्रतीआक्रमण आणि बचावाचे धोरण राबविले असताना गोवा व बेंगळुरू यांनी केवळ आक्रमणावर भर दिला.

आयएसएल फायनल त्रयस्थ ठिकाणी होणार असल्यामुळे दोन्ही संघांना प्रेक्षकांचे भरपूर प्रोत्साहन मिळेल. योगायोगाने याआधी त्रयस्थ ठिकाणची फायनल 2014 मधील पहिल्या मोसमात मुंबईतच झाली होती.

त्रयस्थ ठिकाणच्या प्रेक्षकांना सुद्धा हवासा वाटेल असा हा सामना आहे. अशी ही फायनल त्यांच्यासाठी सुद्धा स्वप्नवत ठरेल.