महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

-शारंग ढोमसे

सन्मानीय अजित दादा पवार,

बारा वर्षे खो-खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आपण आपला मोर्चा पुन्हा एकदा कबड्डीकडे वळवला आहे.प्रो कबड्डीमुळे या खेळाला मिळालेले वलय हे त्यामागील एक कारण असले तरी एकमेव कारण नाही.या १२ वर्षात जरी आपण या संघटनेवर नव्हता तरी सगळी सूत्रे आपल्याकडेच होती असे म्हटले तर वावगे ठरू नये.शरद पवारांचे कबड्डीबद्दलचे योगदान सर्वश्रुत आहे.काकांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आपणही कबड्डी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.’महाकबड्डी लीग’ सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यापासून ते अनेक कबड्डी खेळाडूंना नोकऱ्या मिळवून देण्यापर्यंत अशा विविध प्रकारे महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी आपले योगदान बहुमोल राहिलेले आहे.त्यामुळेच राज्याच्या कबड्डीची सूत्रे आपल्या हातात येणे ही अभिनंदनीयच बाब आहे.

मात्र आपण अशा परिस्थितीत राज्याच्या कबड्डीचे सूत्रे आपल्या हातात घेत आहात जिथे महाराष्ट्राची कबड्डीत पीछेहाट झालेली आहे.हरयाणा,हिमाचल प्रदेश ही राज्ये कधीच आपल्या पुढे निघून गेली आहेत.मागच्या वर्षी जरी आपण राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असले तरी त्यासाठी ११ वर्षे थांबावे लागले हे विसरून चालणार नाही. आपल्या महिला संघाने तर शेवटचे विजेतेपद १९८४ साली जिंकले होते.

कबड्डीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. जिल्हा अजिंक्यपद,राज्य अजिंक्यपद,राष्ट्रीय स्पर्धांकडे कबड्डी रसिक,प्रसारमाध्यमे अधिक लक्ष देऊ लागली आहेत.त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक जागरूक कब्बडी रसिकांच्या आणि हितचिंतकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आपणासमोर असेल.महाराष्ट्र राज्य कबड्डीचे हितचिंतक म्हणून आम्हाला असलेल्या अपेक्षा आपणाला कळवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. म्हणूनच हा पत्रप्रपंच.

संघ निवडीतील ‘गोंधळच गोंधळ’ थांबवा!

राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवड ही गेल्या ४-५ वर्षांपासून या ना त्या कारणाने सतत वादात आलेली आहे.आपला खेळाडू संघात यावा यासाठी राजकारण्यांपासून ते प्रशिक्षकांपर्यंत सर्वच आपले ‘कसब’ पणाला लावत असतात.आयत्या वेळेला पात्रता नसतानाही खेळाडू संघात घुसवले जातात.उत्तम कामगिरी करूनही काही खेळाडुंना न्याय मिळत नाही.त्यामुळे संघ निवडीत सर्रास चालणारी ही ‘सेटिंग’ आधी थांबवा.संघ निवडीचे संपूर्ण अधिकार हे निवड समितीला असावेत आणि त्यात कोणीही दखल देता काम नये.निवड समितीतदेखील राज्यातील विविध विभागांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे.निवड समितीने संघ हे पत्रकार परिषदेतच जाहीर करावे.म्हणजे ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये निवड समितीवर प्रसार माध्यमांचा दबाव असतो त्याचप्रमाणे कबड्डीतही निवड समितीवर प्रसार माध्यमांचा वचक राहील.संघ निवड ही खेळाडू कोणत्या जिल्ह्याचा आहे यापेक्षा त्याची कामगिरी कशी आहे यावर अवलंबून असावी.राज्य अजिंक्यपद स्पर्धेमधील आकडेवारीवर ही संघ निवड आधारलेली असावी.एकूणच संघ निवडीच्या प्रक्रियेतील या सर्व त्रुटी आपल्या कालावधीत दूर होण्याची अपेक्षा आहे.

कारभारातील पारदर्शकता आणि समाजमाध्यमांचा योग्य वापर करावा!

सद्यस्थितीत राज्याच्या कबड्डी प्रशासनात पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने घेतलेले निर्णय मग ते संघ निवडीबाबत असोत किंवा स्पर्धांच्या वेळापत्रक आणि नियोजनाबाबत असोत, ते सर्वसामान्य कबड्डी रसिकांपर्यंत पोहचवण्याचे काम फक्त वृत्तपत्रांच्याच माध्यमातून होते. फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्रामच्या जमान्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कबड्डी पोहचवण्यासाठी या सर्व माध्यमात संघटनेचे अस्तित्व असणे गरजेचे आहे.संघटनेचे अधिकृत संकेतस्थळ(वेबसाईट) हे फक्त नावपूरतेच आहे.त्यावर फारशी माहिती अद्ययावत केली जात नाही.त्यामुळे सर्वप्रथम संघटनेची वेबसाईट अद्ययावत करून त्यावर वेळोवेळी सर्व प्रकारची माहिती दिली जाणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होऊ देऊ नका!

यंदाची आशियाई स्पर्धा सोडली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतीय संघात कायम दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. दोन वर्षांपूर्वी २०१६ च्या विश्वचषकासाठी रिशांक आणि काशी यांना उत्तम कामगिरी असूनही डावलले गेले.महाराष्ट्राच्या कबड्डी नेतृत्वाने या अन्यायावर कुठलीही ठोस भूमिका घेणे तर दूरच साधी नाराजीही व्यक्त केल्याचे आठवत नाही.भविष्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये आणि झालाच तर आपण त्याविरुद्ध योग्य ती भूमिका घ्यावी हे माफक अपेक्षा.

महाकबड्डी लीग चे पुनरुज्जीवन!

तीन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये राज्य कबड्डी संघटनेने आपल्या खेळाडूंना आपला खेळ संपूर्ण महाराष्ट्राला दाखवता यावा यासाठी
‘महाकबड्डी लीग’ सारखा मोठा मंच उपलब्ध करून दिला.महिलांसाठी असलेली ही देशातील पहिली व्यावसायिक कबड्डी लीग ठरली.खेळाडूंना अर्थार्जनासाठी अजून एक मार्ग या निमित्ताने खुला झाला.मात्र दोनच वर्षांत महाकबड्डी लीग चा हा डोलारा कोसळला.ही लीग जास्त लोकप्रिय होऊ शकली नाही याचे कारण होते नियोजनातील अभाव.सामन्यांचे थेट प्रक्षेपणही अशा वाहिनीवर करण्यात आले जिकडे प्रेक्षक फारसे फिरकत नाहीत.महाकबड्डी लीग हे महाराष्ट्राच्या कबड्डीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल होते आणि म्हणूनच आपल्याकडून महाकबड्डी लीगचे पुनरुज्जीवन व्हावे ही अपेक्षा

आम्हाला या गोष्टीची संपूर्ण कल्पना आहे की वरील सगळ्या गोष्टी बोलायला जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या अंमलात आणणे तितकेच अवघड आहे.मात्र या सर्व गोष्टी अंमलात आणण्याची धमक फक्त आपल्याच नेतृत्वात आहे हेही तितकेच खरे.येत्या काळात आपण महाराष्ट्राच्या कबड्डीला गतवैभव प्राप्त करून द्याल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि आपणाला या नवीन जबाबदारीसाठी अनेकानेक शुभेच्छा देतो.

आपले,
महास्पोर्ट्स