पी व्ही सिंधूने रचला इतिहास …

पी व्ही सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहरा हिचा पराभव करत कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकली आहे. कोरिया ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा अंतिम सामना सिंधूने २२-२०, ११-२१, २१-१८ असा जिंकत सुवर्ण पदक पटकावले आहे.

पहिल्या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरुवात करताना ओकुहरावर ६-५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ओकुहराने पहिला सेट ७-७ असा बरोबरीत आणला. या सेटमध्ये सिंधू खूप आक्रमक दिसली तर ओकुहरा हिने डिफेन्सवर अधिक जोर दिला. सामन्यात कमी चुका करत ओकुहराने १२-१० अशी आघाडी घेतली. मिड इंटरव्हल नंतर सिंधूने सेटवर नियंत्रण प्रस्थापित करत पुनरागमन केले आणि सेटमध्ये १५-१४ अशी आघाडी मिळवली. मागील काही सामन्यातील अनुभव पणाला लावून ओकुहराने २०-१८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोन मॅच पॉईंट वाचवत सिंधूने पहिला सेट २०-२० असा बरोबरीत आणला. लयीत परतलेल्या सिंधूने आणखी दोन गुण म्हणजे सलग चार गुण घेत पहिला सेट २२-२० असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीलला ओकुहराने ५-२ अशी आघाडी मिळवली. लॉन्ग रॅलीजचा खेळ करत तिने मीड इंटरव्हल पर्यंत ११-६ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला चांगली कामगिरी करता येत नव्हती याचा फायदा उचलत ओकुहराने सामन्यात १६-९ अशी सात गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर या सेटमध्ये सिंधूला पुनरागमनाची संधी न देता ओकुहराने दुसरा सेट २१-११ असा जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने आक्रमक खेळाला प्राधान्य देत सुरुवातीलाच ८-४ अशी आघाडी मिळवली. मीड इंटरव्हलला जेव्हा विश्रांती मिळाली तेव्हा सिंधू ११-६ अशी बढत घेतली. या सेटमध्ये सिंधूने उत्तम खेळाचे प्रदर्शन केली. परंतु सिंधूचा पाठलाग करत ओकुहराने पुनरागमनाचा प्रयन्त केला तरी देखील सिंधी १५-१२ अशी आघाडीवर होती. २९ शॉट्सची रॅली जिंकत सिंधूने निर्णायक सेटमध्ये १६-१३ अशी आघाडी मिळवली. बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतिमफेरीतील पराभवाची परतफेड कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिमफेरीत करत सिंधूने निर्णायक सेट २१-१८ असा जिकंत कोरिया ओपन सुपर सिरिजचे सुवर्णपदक जिंकले.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –
#१ पीव्ही सिंधूला जागतिक चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत नोजोमी ओकुहरा हिने पराभूत केले होते . त्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

#२ कोरिया ओपन सुपर सिरीज जिकंत सिंधूने इतिहास रचला आहे. कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

#३ जागतिक मानांकन यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूचे हे तिसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. तर २०१७ सालातील भारतीयाने जिंकेलेले ५वे सुपर सिरीजचे विजेतेपद आहे.

#४ जागतिक मानांकन यादीत नोजोमी ओकुहरा नवव्या स्थानावर आहे. सिंधू आणि ओकुहराया दोन खेळाडूंमध्ये या सामन्याअगोदर ७ सामने झाले होते. त्यात ४ सामने ओकुहराने जिंकले होते तर ३ सामने सिंधूने जिंकले होते. या सामन्यातील विजयासह दोन्ही खेळाडूंनी आता प्रत्येकी ४-४ सामने जिंकले आहेत.

#५ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट जिंकल्यानंतर ओकुहराने सिंधूला नमवले होते. परंतु या सामन्यात सिंधूने त्याची पुनरावृत्ती करण्यापासून ओकुहराला रोखले.

#६ या स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व सामन्यांपासून सर्व सामने जिंकण्यासाठी तीन सेट खेळावे लागले आहेत.