स्मिथ बरोबरच कसोटी पदार्पण करणारा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा नवीन कर्णधार

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या चांगल्याच अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊन येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चेंडू बरोबर छेडछाड करताना पकडले गेले होते.

या प्रकरणाची शनिवारी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांनी कबुलीही दिली होती. यामुळे या दोघांवरही आयसीसीने कारवाई केली. या प्रकरणामुळे रविवारी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या आधीच स्मिथला कर्णधारपद आणि डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपद सोडावे लागले होते.

तसेच आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रोफ्टला पुढील सामना खेळण्यापासून मनाई केली आहे. त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन कर्णधाराची निवड केली आहे. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाचे नेतृत्व करणाऱ्या टीम पेनकडेच कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया संघाची जबादारी सोपवण्यात आली आहे.

यामुळेच तो ऑस्ट्रेलियाचा ४६ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. तसेच तो ऍडम गिलख्रिस्ट नंतरचा पहिलाच यष्टीरक्षक असेल जो ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेतृत्व करणार आहे.

पेनने मागील वर्षीच जवळजवळ ७ वर्षांनी ऑस्ट्रेलिया कसोटी संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर लगेचच त्याला यावर्षी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे पेनने आणि स्मिथने एकाच कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.

पेनने आत्तापर्यंत १२ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ४१.६६ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ३० मार्चला जोहान्सबर्गला सुरु होईल.