पाकिस्तानचे भारतासमोर ३०९ धावांचे लक्ष्य

आज अंध विश्वचषकाचा अंतिम सामना युएईमधील शारजा क्रिकेट स्टेडिअमवर सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०८ धावा केल्या असून भारतासमोर ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पाकिस्तानकडून बदर मुनीरने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रियासत खान आणि कर्णधार नासर अलीने अनुक्रमे ४८ आणि ४७ धावा केल्या. यांच्या जोरावरच पाकिस्तानने ३०० धावांचा टप्पा पार केला.

भारतीय संघाने उपांत्य सामन्यात बांगलादेश संघावर विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या सामन्यात गणेशभाई मधुकरने ६९ चेंडूत ११२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तर पाकिस्तानने उपांत्य सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले होते.

हा ८ वा अंध विश्वचषक असून या स्पर्धेत १३ जानेवारीला साखळी फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

भारतीय संघ मागील विश्वचषक विजेता संघ आहे.