नॅथन लियॉनने फक्त 6 चेंडूत घेतल्या तब्बल 4 विकेट

अबुधाबी। पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात आजपासून(16 आॅक्टोबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी आॅस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने पाकिस्तानच्या फलंदाजीला मोठे धक्के दिले आहेत. त्याने 6 चेंडूत पाकिस्तानच्या 4 फलंदाजांना बाद केले आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण लियॉनने पहिल्याच सत्रात पाकिस्ताच्या 4 विकेट घेतल्या.

त्याने त्याच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अझर अलीला 15 धावांवर असताना स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने हॅरिस सोहिलला ट्रेविस हेडकडे झेल देण्यास भाग पाडले.

यानंतर लियॉनने त्याच्या पाचव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर असद शाफिकला बाद केले. ही विकेट घेतल्यानंतर या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने बाबर आझमला त्रिफळाचीत केले.

लियॉनने बाद केलेल्या चार फलंदाजांपैकी हॅरिस सोहिल, असद शाफिक आणि बाबर आझम यांना भोपळाही फोडता आलेला नाही. या विकेट लवकर पडल्याने पाकिस्तानची आवस्था पहिल्या सत्रात 5 बाद 77 धावा अशी झाली होती.

मात्र त्यानंतर कसोटी पदार्पणाचा सामना खेळणारा फकार जमान आणि कर्णधार सर्फराज अहमदने पाकिस्तानचा डाव सांभाळताना 147 धावांची भक्कम भागीदारी रचली आहे. मात्र या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. हे दोघेही प्रत्येकी 94 धावांवर बाद झाले.

या दोघांच्या या संघर्षानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 282 धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलियाकडून लियॉन व्यतिरिक्त मार्नस लेबसचगनेने 3 आणि मिशेल मार्शने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

तर आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 2 बाद 20 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-