जर भारत पाकिस्तानात खेळणार असेल तरच आम्ही चॅम्पियनशिपमध्ये खेळू -पाकिस्तान

आयसीसीने आयोजन केलेल्या वनडे लीग आणि कसोटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने खेळण्यास मंजुरी दिली आहे. परंतु पाकिस्तानने यासाठी एक अट घातली आहे. ती अट अशी आहे की, भारताने २०१४ मध्ये केलेल्या एमओयू कराराप्रमाणे पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय मालिका खेळायची तयारी दाखवली तरच पाकिस्तान आयसीसीच्या या स्पर्धेत सामील होईल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजाम सेठी म्हणाले की “आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे लीग आणि कसोटी विश्वचषकाच्या स्पर्धेच्या कागदपत्रांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तेव्हाच सही करेल जेव्हा बीसीसीआय २०१४ मध्ये केलेल्या एमओयू द्विपक्षीय मालिका खेळण्याचा कराराची कर्तव्य पूर्ण करेल.”

ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत ते बोलत होते.

ऑकलंडला झालेल्या आयसीसीच्या बैठकीनंतर आयसीसीने कसोटी विश्वचषक खेळणारे ९ संघ जाहीर केले. हे संघ प्रत्येकी ६ मालिका खेळतील. त्याचप्रमाणे १३ संघ वनडे लीग खेळतील.  प्रत्येक संघ ८ मालिका खेळेल. ह्या स्पर्धा २०१९चा विश्वचषक झाल्यावर सुरु होणार आहेत तसेच या स्पर्धेचा २ वर्ष असा कालावधी असेल.

सेठी पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेबद्दल म्हणाले की कोणतीही कसोटी किंवा वनडे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सामन्याशिवाय अर्थहीन आहे. तसेच ते म्हणाले की “आम्ही तेव्हाच सही करू जेव्हा आम्हाला हवे ते मिळेल. भारताने २०१४ मध्ये एमओयू कराराची कर्तव्य पूर्ण करावी.”

काय होता एमओयू द्विपक्षीय करार:
भारत आणि पाकिस्तान मध्ये २०१५ ते २०२३ पर्यंत ६ द्विपक्षीय मालिका खेळण्याचा आणि पहिली मालिका २०१५/१६ मध्ये पाकिस्तान यजमान पद भूषवणार होता असा तो करार होता. परंतु भारत पाकिस्तान संबंध बिघडल्याने हा करार पूर्ण करण्यास बीसीसीआयने नकार दिला होता.