पाकिस्तानचा हा खेळाडू म्हणतो चॅम्पिअन्स ट्रॉफी अंतिम सामन्यातील धोनीचा बळी आवडती विकेट !

पाकिस्तान संघातील तरुण गोलंदाज हसन अलीने माजी भारतीय कर्णधार एम एस धोनीविषयी आदर व्यक्त केला आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान धोनीविषयी आपली मते व्यक्त केली.

पाकिस्तानमधून नेहमीच चांगले गोलंदाज बघायला मिळालेले आहेत. हसन अलीनेही हे सिद्ध केले आहे. तो पाकिस्तानकडून सर्वात जलद ५० बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याचबरोबर त्याने जून महिन्यात पार पडलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेतही उत्तम कामगिरी केली होती.

त्याने चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धोनीला ४ धावांवर असताना हसनच्या गोलंदाजीवर इमाद वासिमने झेलबाद केले होते.

हा धोनीचा बळी आपली आवडती विकेट असल्याचे सांगताना द ट्रिब्युनमधील कोट्सनुसार अली म्हणाला “सगळ्यांना माहित आहे धोनी महान खेळाडू आहे. त्यामुळे साहजिकपणे तुम्हाला चांगले वाटते जेव्हा तुम्ही एका अशा फलंदाजाला बाद करता जो खेळ संपवण्यासाठी (फिनिशिंग कौशल्य) ओळखला जातो. त्याच्या या अंतिम सामन्यातील विकेटने मला आनंद दिला होता.”

पाकिस्तानने या अंतिम सामन्यात भारताला १८० धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.

अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धसुद्धा चॅम्पिअन्स ट्रॉफीत उत्तम गोलंदाजी करताना फाफ दु प्लेसिस, जेपी ड्युमिनी आणि वेन पार्नेल यांसारख्या मोठ्या खेळाडूंना बाद केले होते.

सध्या अली बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे.