दूध विक्रेत्याचा मुलगा करतोय भारतीय संघातून पदार्पण

१९ वर्षांखालील भारतीय संघात पंकज यादव या एका दूध विक्रेत्याच्या मुलाला संधी मिळाली आहे. या भारतीय संघात तो असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने अजून १९ वर्षांखालील भारतीय संघात पदार्पण केलेले नाही.

पंकजच्या अनेक संघ मित्रांच्या घरातील कुणाचा ना कुणाचा तरी क्रिकेटशी संबंध आलेला आहे. परंतु पंकजच्या घरातील कुणाचाही क्रिकेटशी कसलाच संबंध आलेला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हा क्रिकेटचा प्रवास काहीसा खडतर होता.

पंकज हा झारखंडमधील रांची शहरात वाढला आहे. त्याचे वडील दूध विक्रेते असून ते रोज शहरात दूध टाकण्यासाठी जायचे. त्यांच्या या कामात पंकजचे सर्व कुटुंब त्यांना मदत करत. पंकजने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांचा त्याला विरोध होता परंतु त्याच्या आईने त्याला पाठिंबा दिल्याने पंकजचे क्रिकेट सुरु झाले. याविषयी पंकजच्या वडिल चंद्रदेव यादव यांनी फर्स्टपोस्टशी बोलताना सांगितले.

पंकजने युकी नाथ झायांच्याकडे क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी त्याच्या मधील कौशल्य पाहून त्याला फिरकी गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यांनी पंकजला आर्थिक मदतही केली.

यानंतर पंकजने क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्थरावर चांगली कामगिरी करून सर्वांना त्याची दाखल घ्यायला लावली. त्याने २०१६- १७ या मोसमात पार पडलेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंड ट्रॉफी स्पर्धेत बंगाल विरुद्ध ४० धावत ७ बळी घेतले होते.

या कामगिरीच्या जोरावर त्याची चॅलेंजर्स ट्रॉफटीसाठी निवड झाली. परंतु त्याला पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नाही. पण त्याने त्यानंतर झालेल्या तीन सामन्यात ९ बळी घेतले. त्यात एका सामन्यात ५ बळी घेण्याचीही कामगिरी त्याने केली होती. तो या चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

आता पंकजला आज पासून सुरु झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघातून ११ जणांच्या संघात खेळण्यासाठी स्थान मिळणार का हे पाहावे लागेल. भारताचा सामना उद्या ऑस्ट्रेलियाशी रंगणार आहे.