दुसऱ्या कसोटीत पार्थिव पटेलला संधी मिळण्याची दाट शक्यता

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पार्थिव पटेलला ११ जणांच्या संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघांने आज केलेल्या सरावात पार्थिव यष्टिरक्षण करताना दिसला आहे. त्याचमुळे त्याला भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वृद्धिमान सहाऐवजी संघात स्थान मिळू शकते.

सहाने मागील काही सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात आठ धावा केल्या होत्या. मात्र सहाने या सामन्यात यष्टिरक्षण चांगले केले होते. त्याने या सामन्यात एकूण १० झेल घेतले होते.

पार्थिवने त्याचा याआधी शेवटचा सामना १६ ते २० डिसेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यात त्याने ७१ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने इंग्लंड वर १ डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला होता.

याबरोबरच उद्या होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला रोहित शर्मा ऐवजी तर केएल राहुलला शिखर धवन ऐवजी संधी मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या कसोटी मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे.