विक्रमांचा पाऊस पाडत पटना पायरेट्स सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचे विजेते !

चेन्नई | येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमच्या अंतिम सामन्यात पटना पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा ५५-३८ असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचा चषक आपल्या नावे केला. या तीनही वेळेस पटनाच्या संघात प्रदीप नरवालचा समावेश होता. अंतिम सामन्यात कर्णधाराला साजेशी कामगिरी करत प्रदीपने १९ गुण मिळवले आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

नाणेफेक जिंकून गुजरातने पटना पायरेट्सला प्रथम रेडिंग करण्यासाठी आमंत्रित केले. पटना पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने पहिली रेड केली पण त्यात त्याला एकाही गुण मिळाला नाही तर दुसऱ्या बाजूला गुजरातचा कर्णधार सुकेश हेगडेला ही गुण मिळाला नाही. मोनू गोयतने पटनासाठी पहिल्याच रेडमध्ये दोन गुण मिळवले तसेच गुजरातसाठी राकेश नरवालने पहिलीच रेड सुपर रेड केली.

प्रदीप नरवाल गुजरात विरुद्ध संपूर्ण मोसमात चालला नाही आणि या सामन्यातही त्याला गुजरातच्या डिफेन्सने दुसऱ्याच रेड मध्ये बाद केले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला पटना पायरेट्स ऑल आऊट झाले आणि स्कोअर पटना पायरेट्स ३ आणि गुजरात फॉर्च्युनजायंट्स ९ असा झाला. पहिल्या १० मिनिटात पटना पायरेट्सच्या डिफेन्सला एकही गुण नव्हता त्याचबरोबर प्रदीप नरवालला फक्त एकच रेड पॉइंट होता तोही बोनस.

चौदाव्या मिनिटाला सुकेश हेगडे ‘डु ऑर डाय’ रेडमध्ये बाद झाला आणि प्रदीप नरवाल मॅटवर परत आला यानंतर प्रदीपने आपली जादू दाखवत पटना पायरेट्सला आघाडी मिळवून दिली. पंधराव्या मिनिटाला प्रदीप नरवालने सुपर रेड करून गुजरातला ऑलआऊट केले. तेव्हा गुजरात फॉर्च्युनजायंट्स १५ आणि पटना पायरेट्स १५ असा स्कोर बरोबर झाला.

मध्यंतराला गुजरात फॉर्च्युनजायंट्स १८ तर पटना पायरेट्स २१ असा स्कोर होता. चांगली सुरुवात करून सुद्धा गुजरातला आघाडी टिकवता आली नाही. पटनाकडून दोन्ही प्रमुख रेडर्स प्रदीप नरवाल आणि मोनू गोयतने प्रत्येकी ६ गुण मिळवले तर ऑलराउंडर विजयाने ४ गुण मिळवले. गुजरातकडून सचिनने ७ गुण मिळवले पण फझल अत्राचली आणि अबुझार मेघानी या गुजरातच्या स्टार डिफेंडर्सला चांगली कामगिरी करत आली नाही.

दुसऱ्या सत्रात महेंद्र राजपूतला गुजरात फॉर्च्युनजायंट्सकडून मॅटवर उतरविण्यात आले. महेंद्र राजपूतने दोन गुण कमवून सामन्यात चांगली सुरुवात केली. दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला प्रदीप नरवालने दोन गुणांची रेड करून गुजरात फॉर्च्युनजायंट्सला सर्वबाद केले आणि स्कोर गुजरात फॉर्च्युनजायंट्स २१ आणि पटना पायरेट्स २७ असा झाला.

यानंतर ७व्या मिनिटाला प्रदीप आणि मोनू दोघेही बाद झाले तेव्हा पटनाचा एकही रेडर मॅटवर नव्हता. याचा फायदा घेऊन गुजरातला पटनाला ऑल आऊट करणे गरजेचे होते पण विजयच्या एक गुणाच्या रेडने प्रदीप पुन्हा मॅटवर आला यानंतर महेंद्र राजपुतही टॅकल झाला आणि मोनुही मॅटवर परत आला. दुसऱ्या सत्राच्या १५व्या मिनिटाला प्रदीप नरवालने आपला १९ वा सुपर १० पूर्ण केला मात्र गुजरात फॉर्च्युनजायंट्सच्या संघाविरुद्ध हा त्याचा पहिला सुपर १० होता. आणि हा सुपर १० सर्वात महत्त्वपूर्ण ठरला. पटनाच्या डिफेन्समध्ये जयदीप नेही हाय ५ पूर्ण केला.

त्यानंतर महेंद्र राजपूत आणि रणजित यांनी दोन गुण आणि तीन गुणांची रेड करून गुजरातला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पटना पायरेट्सचे मोनू आणि प्रदीप नरवाल हे दोनच खेळाडू मॅटवर होते. प्रदीपने रेडमध्ये जाऊन सुपर रेड केली आणि आपल्या डिफेन्सला पुन्हा मॅटवर आणले. त्यानंतर डिफेन्सने पुन्हा सुपर टॅकल केला आणि स्कोअर गुजरात ३४ आणि पटना ४५ असा झाला.

गुजरातच्या सचिनने चौथ्या मिनिटाला सुपर १० पूर्ण केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रदीप नरवालने शेवटच्या मिनिटाला पुन्हा एकदा गुजरात फॉर्च्युनजायंट्सला ऑलआऊट केले.

अखेर प्रदीपच्या १९ गुणांच्या जोरावर पाटणा पायरेट्सने १७ गुणांच्या फरकाने गुजरात फॉर्च्युनजायंट्ला मात दिली.

गुजरातकडून सचिनने ११ गुण मिळवले पण त्यांची जमेची बाजू असणारा त्यांचा डिफेन्स काही खास कामगिरी करू शकला नाही. अबुझरने या सामन्यात फक्त १ गुण मिळवला तर फझलला एकही गुण मिळवता आला नाही.

तर दुसऱ्या बाजूला प्रदीप नरवालने १९ गुण मिळवले त्याचबरोबर मोनू गोयतनेही त्याला चांगली साथ देऊन ९ गुण मिळवले त्याचबरोबर ऑलराऊंडर विजयनेही ७ गुण मिळवले आणि डिफेन्समध्ये जयदीपने हाय ५ केला.

पटना पायरेट्सने सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचा चषक आपल्या नावे केला आहे. तिन्ही विजेत्या संघाकडून प्रदीप नरवालने अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून पटनाला विजय मिळवून दिला आहे. पटना पायरेट्सच्या संघाचे नाव या विजयानंतर प्रो कबड्डीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहले जाणार आहे.