पटणा पायरेट्स विरुद्ध यु.पी.योद्धा सामना २७-२७ बरोबरीत

काल प्रो कबडीमध्ये पटणा पायरेट्स आणि यु.पी.योद्धा यांच्यात झालेला सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला. प्रदीप नरवालने शेवटच्या काही मिनिटात केलेल्या उत्तम खेळाचा पटणा पायरेट्सला फायदा झाला. त्यामुळे ते सामना बरोबरीत सोडवू शकले. यु.पी.संघाकडून नितीन तोमर याने उत्तम खेळ केला. त्याला महेश गौड आणि रिशांक यांची चांगली साथ लाभली.

पहिल्या सत्रात ५व्या मिनिटाला दोन्ही संघ ३-३ अश्या बरोबरीत होते. प्रदीप नरवाल याला यु.पीच्या डिफेन्सने बाद केले. त्यानंतर पुर्ण सामन्यात पटणाचा संघ आघाडी घेऊ शकला नाही. रिशांक देवाडीगा आणि महेश गौड यु.पी.साठी गुण मिळवत होते . तर पटणासाठी मोनू गोयत गुण मिळवत होता. पहिले सत्र संपले तेव्हा यु.पी.योद्धाकडे १३-१० अशा तीन गुणांची आघाडी होती.

दुसरे सत्र सुरु झाले तरी सामन्यात यु.पी. योद्धाची आघाडी कायम होती. ५व्या मिनिटाला महेश गौड बाद झाला तरी यु.पी. १७-१४ असे पुढे होते. ११व्या मिनिटाला प्रदीप नरवाल तर १३ व्या मिनिटाला मोनू गोयत बाद झाले. याचा फायदा यु.पी.ला झाला. १५व्या मिनिटाला त्यांची आघाडी २५-१७ अशी झाली. १६व्या मिनिटाला रिशांक देवाडीगा याला सुपर टॅकल करत दोन गुण मिळवले. पटणाने आघाडी २०-२५ अशी भरून काढली.

शेवटच्या चार मिनिटात प्रदीप नरवालने रेडींगमध्ये ५ गुण मिळवले. तर राजेश नरवाल हा रेडरने स्पर्श न करता लॉबीमध्ये गेल्याचा एक ज्यादाचा गुण पटणाला मिळाला. सामना संपण्यास काही सेकंद बाकी सामना २७-२७ अशा बरोबरीत आला. नितीन तोमरने संयम दाखवत शेवटची रेड पूर्ण केली. या रेडमध्ये तो बादही झाला नाही आणि गुणही मिळवला नाही. त्यामुळे हा सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला.

या मोसमामध्ये हा बरोबरीत सुटलेला दुसरा सामना ठरला. या अगोदर हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात यांचा सामना बरोबरीत सुटलेला होता. विशेष बाब म्हणजे हा सामना देखील २७-२७ असा बरोबरीत सुटला होता.