पटणा करणार का गुजरातविरुद्ध मागील पराभवाची परतफेड

प्रो कबड्डीमध्ये आज जयपूरच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये इंटर झोनल वाइल्ड कार्ड पहिला सामना होणार आहे. झोन ए माधील अव्वल संघ गुजरात फॉरचून जायन्टस आणि सलग दोन वेळेसचे विजेते पटणा पायरेट्स या संघात होणार आहे. या दोन संघात या अगोदर एक सामना झाला होता त्या सामन्यात जायन्टस पायरेट्सवर भारी पडले होते. गुजरातने पहिला सामना ३०-२९ असा जिंकला होता.

गुजरात संघ या मोसमात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. या संघाने खेळलेल्या १९ सामन्यात १२ विजय मिळवले आहेत तर चार सामने त्यांनी गमावले आहेत. बाकीचे तीन सामने त्यांना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे. या संघाने मागील पाच सामन्यात ४ विजय तर एक पराभव स्वीकारला आहे. या संघातील खेळाडू भन्नाट लयीत आहेत.

डिफेन्समध्ये हा संघ जबरदस्त संतुलित आहे. लेफ्ट आणि राइट राइट कॉर्नर्समध्ये फाझल आणि अबोझार हे इराणी खेळाडू विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत. कव्हर म्हणून परवेश बन्सल त्यांना उत्तम साथ देत आहे. पटणा विरुद्धच्या मागील सामन्यात परवेशने हाय फाईव्ह मिळवला होता त्याच बरोबर अबोझारने देखील हाय फाईव्ह मिळवला होता.

रेडींगची पूर्ण जबाबदारी सचिन आणि कर्णधार सुकेश हेगडे या रेडरवर असणार आहे. सचिन याने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीचा सुरुवात या मोसमात केली असली तरी तो एक जबरदस्त रेडर म्हणून खेळात आहे. त्याच्या खेळात परिपक्वता आहे. त्यामुळे त्याला या मोसमातील शोध म्हटले जात आहे. या संघाकडे उत्तम पर्यायी खेळाडू देखील आहेत. महेंद्र राजपूत बदली खेळाडू म्हणून येऊन सामन्याचा निकाल गुजरातच्या बाजूने लावू शकतो.या मोसमात आपण त्याला हे करताना अनेकदा पहिले आहे.

पटणा पायरेट्स संघाबाबत बोलायचे झाले तर या संघाची ताकद हे त्यांचे रेडर आहेत. प्रो कबड्डीमध्ये एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवणारा प्रदीप नरवाल या संघाचा कर्णधार आहे आणि तो या मोसमात सुरुवातीपासूनच लयीत आहे. त्याला रेडींगमध्ये मोनू गोयत उत्तम साथ देत आहे. डिफेन्समध्ये या संघाला विशाल माने याच्यावर निर्भर राहावे लागणार आहे. विशाल हा एकमेव अनुभवी डिफेंडर या संघात आहे.

मागील सामन्यात त्यांना रेडींगमध्ये जास्त गुण मिळवत आले नाहीत आणि त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. प्रदीप आणि मोनू दोघेही मागील सामन्यात अपयशी ठरले होते. ते या सामन्यात मागील सामन्यातील चुका करणार नाहीत याची दक्षता पटणा संघाला घ्यावी लागेल. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हा सामना खूप अटातटीचा होणार यात शंका नाही.