डुबकी किंग परदीप नरवालला प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी

दिल्ली। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात सध्या दिल्ली लेग सुरु असून आजपासून इंटरझोन चॅलेंज विक सुरु झाले आहे. यामध्ये आज(4 डिसेंबर) पहिला सामना पटना पायरेट्स विरुद्ध गुजराच फॉर्च्यूनजायंट्स संघात रंगणार आहे.

या सामन्यात  पटना पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवालला प्रो कबड्डीच्या इतिहासात 800 गुण मिळवण्याची संधी आहे. यासाठी त्याला 11 गुणांची आवश्यकता आहे. त्याने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये 78 सामन्यात 789 गुण मिळवले असून त्यातील 782 गुण त्याने रेडींगमधून तर 7 गुण टॅकलचे मिळवले आहेत.

त्यामुळे आज जर परदीपने 800 गुणांचा टप्पा गाठला तर तो प्रो कबड्डीच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा केवळ दुसराच खेळाडू ठरेल. त्याच्या आधी तेलगू टायटन्सचा स्टार रेडर राहुल चौधरीने हा टप्पा पार केला आहे.

तो प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण घेणारा तसेच 800 गुणांचा टप्पा गाठणारा सध्या एकमेव खेळाडू आहे. राहुलने 91 सामन्यात 803 गुण मिळवले आहेत.

परदीपसाठी प्रो कबड्डीचा सहावा मोसमही यशस्वी ठरत आहे. त्याने सहाव्या मोसमात 14 सामन्यात 11.21 च्या सरासरीने 157 गुण मिळवले आहेत. तसेच तो सहाव्या मोसमात आत्तापर्यंत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कबड्डीपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रेडींगमध्येही परदीपला 800 गुण मिळवण्याची संधी-

डुबकी किंग परदीप नरवालला प्रो कबड्डीमध्ये रेडींगमध्येही 800 गुणांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 18 गुणांची आवश्यकता आहे. जर त्याने हे 18 गुण रेडींगमधून मिळवले तर तो रेडींगमध्ये 800 गुण मिळवणारा पहिलाच कबड्डीपटू ठरेल.

आत्तापर्यंत कोणत्याही कबड्डीपटूला प्रोकबड्डीमध्ये 800 गुण रेडींगमधून मिळवता आलेले नाहीत. परदीप प्रो कबड्डीमध्ये रेडींगचे सर्वाधिक गुण घेणारा कबड्डीपटू आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे कबड्डीपटू:

803 – राहुल चौधरी (91 सामने)

789 – परदीप नरवाल (78 सामने)

704 – अजय ठाकूर (96 सामने)

700 – दीपक हुडा (94 सामने)

602 – काशिलिंग अडके (87 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

‘इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग’साठी महाराष्ट्रात होणार ट्रायल

२०१९च्या आयपीएलपासून दिल्ली डेयरडेविल्स ओळखले जाणार या नवीन नावाने

देवासाठी क्रिकेट सोडलेला क्रिकेटर मुलासाठी करतोय पुनरागमन