पटणा पायरेट्स आणि बंगाल वोरीयर्स यांच्यात होणार बंगाल लेगचा पहिला सामना !

नेताजी सुभाष चंद्र बोस इंडोर स्टेडियम, कोलकाता येथे आज बंगाल वोरीयर्स आणि पटणा पायरेट्स यांच्यात कोलकाता लेगचा पहिला सामना होणार आहे. बंगाल पुढे मागील दोन मोसमाचे विजेते असलेल्या पटणा पायरेट्सचे कडवे आव्हान असणार आहे.

मागील आठ्वड्यात या दोन संघात एक रोमहर्षक सामना कबड्डी प्रेमींना बघायला मिळाला होता, हा सामना ३६-३६ असा बरोबरीत सुटला होता. या दोनीही संघाने आपले मागील सामने जिंकले आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल.

संघाचा कर्णधार सुरजीत सिंग हा जरी डिफेंडर असला तरी बंगालचा हा संघ त्यांच्या रेडर्ससाठी ओळखला जातो. मणिंदर सिंग, जंग कुंग ली आणि दीपक नरवाल सारखे उत्कृष्ट रेडर या संघात आहेत. मागील चार सामन्यात बंगालने एकही सामना हरला नाही, त्यांचे २ सामने बरोबरीत सुटले आहेत तर २ सामने त्यांनी जिंकले आहेत.

दुसऱ्या बाजूला जर पटणाने हा सामना जिंकला तर ते झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचतील. संघाचा कर्णधार आणि प्रमुख रेडर प्रदीप नरवाल, रेडर मोनू गोयत आणि विनोद कुमार या सर्वानी रेडींग मध्ये सांघिक कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिले आहेत, तर विशाल माने ही डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करत आहे.

मागील सामान्य प्रमाणेच हा ही सामना रोमहर्षक होणार असे दिसून येत आहे.