कमकुवत डिफेन्समुळे पटणा पायरेट्सचा पराभव: राम मेहर सिंग

प्रो कबड्डी ५व्या मोसमाचा शेवटचा लेग पुण्यात चालू आहे.आज लेगच्या दुसऱ्या दिवशी तामिल थालयवजने पटणा पायरेट्सचा ४०-३७ असा पराभव केला. प्रदीप नरवालने या सामन्यात सर्वाधिक म्हणजेच २० गुण मिळवले तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला तामिल थालयवजच्या संघाने ऑलराऊंड खेळ केला. रेडींगमध्ये कर्णधार अजय ठाकूर आणि डिफन्समध्ये अमित हुडा यांनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

सामन्या नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये पटणाच्या प्रशिक्षकांना त्यांच्या संघाच्या खेळाबद्दल विचारले असता ते म्हणाले

” आमचा संघ हा रेडरचा संघ म्हणून ओळखला जातो पण सामने जिंकण्यासाठी फक्त रेडरवर अवलंबून राहता येत नाही, तर डिफेन्सला हि चांगली कामगिरी करावी लागते. आमचे दोन्ही प्रमुख डिफेंडर सचिन शिंगाडे आणि विशाल माने हे मागील काही सामन्यात चांगली कामगिरी करत नाहीत. यांच्या सारख्या अनुभवी खेळाडूंकडून अशी अपेक्षा नाही.”

” आजच्या सामन्यात तामिलच्या संघाने उत्तम कामगिरी केली, हा त्यांचा अंतिम सामना होता ते या आधीच क्वालिफायर्सच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत पण आम्ही झोन बीमध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो आणि जर आम्ही पुढील सामन्यात चांगली कामगिरी केली तर आम्ही नक्कीच या वर्षीही प्रो कबड्डी जिंकून दाखवू. “