PBL: आज किदाम्बी श्रीकांत समोर प्रणॉयचे मोठे आव्हान

लखनऊ ! पीबीएलमध्ये आज लखनऊ लेगच्या दुसऱ्या दिवशी अवध वॉरियर्सचा संघ घरच्या मैदानावर अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना लखनऊच्या बाबू बनारसीदास बॅडमिंटन अकॅडमीच्या मैदानात होणार आहे.

या दोन्ही संघात जागतिक बॅडमिंटनमध्ये लौकिक मिळवलेले खेळाडू आहेत. अवध वॉरियर्स संघात भारताचे आघाडीचे बॅडमिंटन खेळाडूंचा भरणा आहे. या संघात साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत, पी. कश्यप हे आहेत. त्याचबरोबर अवधच्या संघात महिलांच्या जागतिक मानांकन यादीत सातव्या स्थानावर असणारी क्रिस्टिना पेडर्सन आहे.

अहमदाबाद संघाचा विचार केला तर या संघात महिलांच्या जागतिक मानांकन यादीत अव्वल चायनीज खेळाडू ताइ झू यिंग आहे. पुरुषांमध्ये या संघाकडे एच. एस. प्रणॉय आहे. प्रणॉय याने २०१७ साली झालेली राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आणि अमेरिकन ओपन या स्पर्धा जिंकल्या होत्या.

आज ताइ झू यिंग हिच्या विरुद्ध अवध वॉरियर्स जागतिक मानांकन यादीत सातव्या स्थानावर असणारी क्रिस्टिना पेडर्सनला मैदानात उतरवले. या संघातील प्रमुख महिला खेळाडू जागतिक मानांकन यादीत सध्या १२व्या स्थानी असणारी साईना नेहवाल असेल हे ऑर्डर ऑफ प्ले निश्चित झाल्यावर समजेल.

पुरुषांमध्ये किदांबी श्रीकांत विरुद्ध एच.एस. प्रणॉय यांचा सामना जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिमफेरीची पुनरावृत्ती होणार की किदांबी श्रीकांत हा सामना जिंकून पराभवाची परतफेड करणार हे आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण असेल.