प्रीमिअर बॅडमिंटन लीगचा लखनऊ लेग आजपासून

प्रीमिअर बॅडमिंटनचे तिसरे पर्व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर दुसऱ्या लेगमध्ये म्हणजे लखनऊ लेगमध्ये प्रवेश करत आहे. लखनऊ येथील बाबू बनारसी दास युपी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये हे सामने होणार आहेत. लखनऊ हे अवध वॉरियर्सचे होम आहे.
 
अवध वॉरियर्स हा संघ प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सध्या पहिल्या स्थानावर आहे. या संघात भारतीय सुपरस्टार किदांबी श्रीकांत, साईना नेहवाल, पी. कश्यप आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये क्रिस्टीना पेडर्सन आहे,जी महिलांच्या जागतिक मानांकन यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या मातब्बर खेळाडूंमुळे अवध वॉरियर्स संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो.
 
आज १ जानेवारी रोजी प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये मुंबई रॉकेट्स विरुद्ध बेंगलुरू ब्लास्टर्स सामना रंगणार आहे. या दोन्ही संघाने मागील सामन्यात दिल्ली संघाला हरवले होते. मुबई संघाने दिल्लीला ४-१ असे हरवले होते तर बेंगलुरू ब्लास्टर्सने ५-२ असे हरवले होते.
 
आजचा सामना खूप रंगतदार होणार आहे कारण दोन्ही संघात जबरदस्त प्रतिभा लाभलेले खेळाडू आहेत. बेंगलुरू ब्लास्टर्स संघात पुरुष एकेरीमध्ये जागतिक मानांकन यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा डेन्मार्कचा व्हिक्टर अलेक्सन आहे तर महिला विभागाचे नेत्रुत्व एन.सिक्की रेड्डी करेल.
 
मुंबई रॉकेट्स संघात पुरुष एकेरीमध्ये जागतिक मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर असणारा कोरियन सुपरस्टार सन वॅन हो आहे तर भारताचा गुणी बॅडमिंटनपटू समीर वर्मा देखील मुंबई संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मुंबई आणि आणि बेंगलुरुचे संघ गुणतक्त्यात सर्वात खाली असून ते अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.
 
व्हिक्टर अलेक्सन विरुद्ध सन वॅन हो यांचा सामना आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण असणार आहे.