PBL2017: बेगलुरू ब्लास्टर्सकडून मुंबई रॉकेटचा धुव्वा

लखनऊ ! काल पीबीएलमध्ये लखनऊ लेगच्या पहिल्या दिवशी बेंगलुरू ब्लास्टर्सने मुंबई रॉकेट्सचा ६-(-१) असा मोठा पराभव केला. या विजयासह बेंगलुरू ब्लास्टर्स संघाने गुणतक्त्यात ११ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली तर पराभवामुळे मुंबई रॉकेट्स सर्वात खालच्या ८व्या स्थानावर फेकले गेले. पुरुषांच्या जागतिक मानांकन यादीत पहिल्या स्थानावर असणारा व्हिक्टर अलेक्सन बेंगलुरू ब्लास्टर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

११ टायमधील पहिला सामना मिश्र दुहेरीच्या झाला. या सामन्यात बेंगलुरू ब्लास्टर्ससाठी एन.सिक्की रेड्डी आणि किम सा राँग तर मुंबई रॉकेट्ससाठी गॅब्रीला स्टेओवा मैदानात उतरले. पहिला सेट बेंगलुरू ब्लास्टर्सने १५-८ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मुंबईने चांगला खेळ केला आणि सेट १५-१० असा जिंकला. सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये येऊन ठेपला. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा बेंगलुरू ब्लास्टर्सचे वर्चस्व स्थापन निर्माण केले आणि सेट १५-१० असा जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासह बेंगलुरू ब्लास्टर्सने टाईमध्ये १-० अशी आघाडी घेतली.

दुसरा सामना महिलांच्या जागतिक मानांकन यादीत ७व्या क्रमांकावर असणाऱ्या बेंगलुरू ब्लास्टर्सच्या ख्रिस्टीना गिल्मोर विरुद्ध बैवान झांग यांच्यात झाला. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. हा सेट ख्रिस्टीनाने १५-१४ असा जिंकला. दुसरा सेट आरामात १५-१० असा जिंकला. ख्रिस्टीनाने सामना जिंकत बेंगलुरू ब्लास्टर्सला २-०अशी आघाडी मिळवली.

तिसरा सामना पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अव्व्ल असणाऱ्या व्हिक्टर अलेक्सन विरुद्ध जागतिक क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू सन वॅन हो यांच्यात झाला. ही ट्रम्प मॅच होती. या सामन्यात व्हिक्टरने सन वॅन हो याचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ट्रम्प मॅच असल्याने एक बोनस गुण देखील बेंगलुरू ब्लास्टर्सच्या खात्यात जमा झाला. बेंगलुरू ब्लास्टर्स लेगमध्ये ४-० असे आघाडीवर झाले.

पुढचा सामना पुरुष एकेरीचा झाला. या सामन्यात मुंबईचा समीर वर्मा ट्रम्प मॅचच खेळण्यासाठी उतरला. त्याच्या विरुद्ध चँग वेई फॅंग याला ब्लास्टर्सने मैदानात उतरवले. पहिला सेट समीर वर्माने १५-९ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये चँग याने कडवा प्रतिकार केला आणि दुसरा सेट १५-८ असा जिंकला. त्यामुळे सामना निर्णायक सेटमध्ये आला. या सेटमध्ये देखील बेंगलुरूच्या खेळाडूचे वर्चस्व राहिले आणि हा सेट त्याने १५-६ असा जिंकला. ट्रम्प मॅच गमावल्याने मुंबई रॉकेट्सच्या खात्यात एक निगेटिव्ह गुण जोडला गेला. बेंगलुरू ब्लास्टर्सची आघाडी ५-(-१) अशी झाली.

टायमधील शेवटची लढत पुरुष दुहेरीची होती. हा सामना बेंगलुरू ब्लास्टर्सचे किम सा राँग आणि मॅटीअस बोइ विरुद्ध मुंबई रॉकेट्सचे ली यंग डाइ आणि बोईन नेउंग टॅग असा झाला. पहिला सेट गमावल्यानंतर उर्वरित दोन सेट जिंकत बेंगलुरू संघाने हा सामना खिशात घातला. या विजयासह बेंगलुरू ब्लास्टर्सने हा टाय ६-(-१) असा जिंकला.