पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारताला पाठवणार लीगल नोटीस…

भारतीय क्रिकेट बोर्ड सध्या रोज नवनवीन संकटांचा सामना करत आहे. त्यात भर म्हणून कि काय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबी भारतीय क्रिकेट बोर्डला (बीसीसीआय ) ला लीगल नोटीस पाठवणार आहे. पुढील आठवड्यात पाठवण्यात येणाऱ्या ह्या नोटीसमध्ये बीसीसीआयकडून क्रिकेट मालिका खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे नुकसान भरपाई मिळवी हा मुख्य उद्देश असेल.

 

पीसीबीचे सल्लागार सलमान नासीर यांनी गेल्याच आठवड्यात इंग्लंड येथे भेट देऊन या नोटीशीची तयारी सुरु केली आहे.

 

पीसीबीचे सल्लागार सलमान नासीर म्हणाले, “आम्ही ह्या अधिकृत नोटीसच्या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून लंडनमध्ये भेटलो. आम्ही आयसीसीच्या मीटिंगच्या वेळीच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती. ”

 

बीसीसीआयबरोबर झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे २०१४ साली भारताने पाकिस्तानबरोबर दोन मालिका खेळणे आवश्यक होते. परंतु भारताने नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला.

 

पीसीबीच्या सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानबरोबर न झालेल्या मालिकांसाठी पाकिस्तान जबाबदार नाही. बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्यातील गोष्टी हा त्यांचा अंतर्गत वाद आहे. आयसीसी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आसीसीच्या निर्णयांचा सन्मान करणे प्रत्येक क्रिकेट बोर्डाचे कर्तव्य आहे. २०१४ साली सामंजस्य कराराप्रमाणे आम्ही बीसीसीआयच्या बिग ३ धोरणालाही विरोध केला नव्हता.

 

सामंजस्य कराराप्रमाणे भारताने २०१५ ते २०२३ या वर्षात पाकिस्तानबरोबर ६ मालिका खेळणे अपेक्षित होते. तसेच यातील ३ मालिका ह्या पाकिस्तानच्या भूमीवर होणार होत्या.

 

पीसीबीचे सल्लागार सलमान नासीर यांच्या मते पाकिस्तानचं अंदाजे २०० मिलियन अमेरिकी डॉलरच नुकसान भारताच्या मालिका न खेळण्यामुळे झालं आहे.